जिल्हाधिकारी यांची वसुंधरा अभियानांतर्गत सुरू असलेल्या सांगोला नगरपरिषदेच्या विविध उपक्रमांना भेटी
नगरपरिषद प्रशासनाचे कार्य व लोकसहभाग यांचे केले कौतुक
सांगोला (कटूसत्य वृत्त):-पर्यावरण संवर्धनाच्या हेतूने राज्य शासनामार्फत सुरू करण्यात आलेल्या पंचतत्वावर आधारित 'माझी वसुंधरा' अभियानाअंतर्गत सांगोला नगरपरिषदेमार्फत सुरू असलेल्या कामांची पाहणी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी श्री. मिलिंद शंभरकर यांनी करून यावर्षी राज्यात नगरपरिषदेस उत्तम क्रमांक मिळण्याच्या दृष्टीने काही महत्वपूर्ण सूचना केल्याची माहिती मुख्याधिकारी श्री.कैलास केंद्रे यांनी दिली. राज्य शासनाच्या माझी वसुंधरा अभियानाची सांगोला नगरपरिषदेमार्फत शहरात प्रभावी अंमलबजावणी सुरू असून याची दखल घेत मा.जिल्हाधिकारी यांनी सह आयुक्त,नगरविकास विभाग यांच्या समवेत वासुद रोड येथील नगरपरिषदेने सुरू केलेली नर्सरी,जलशुद्धीकरण केंद्र येथील "पाणी पुनर्वापर प्रकल्प",साठे नगर येथील नुकताच लागवड केलेला हरितपट्टा, इत्यादी ठिकाणांची पाहणी करून समाधान व्यक्त केले.यावेळी मा.जिल्हाधिकारी यांच्या हस्ते वृक्षारोपण देखील करण्यात आले.
यानंतर मा.जिल्हाधिकारी यांनी नगरपरिषद कार्यालयास भेट दिली.या ठिकाणी मुख्याधिकारी श्री.कैलास केंद्रे यांनी एक झाड भेट देऊन त्यांचे स्वागत केले. या ठिकाणी नगरपरिषद इमारतीवर कार्यान्वित केलेला सोलार प्रकल्पाची पाहणी केली तसेच बचत गटांच्या महिलांनी तयार केलेल्या कापडी पिशव्यांच्या माध्यमातून प्लास्टिकचा वापर टाळून कापडी पिशव्या वापरण्याचा पर्यावरण पूरक संदेश याठिकाणी देण्यात आला.
माझी वसुंधरा अंतर्गत सुरू असलेल्या कामाचे मा.जिल्हाधिकारी यांनी संपूर्ण नगरपरिषद टीम चे कौतुक केले व सांगोला नगरपरिषद यावर्षी राज्यात माझी वसुंधरा अभियानात उत्तम क्रमांक मिळवेल असा आशावाद व्यक्त केला.
0 Comments