पोलिस प्रशिक्षण केंद्रात क्वारंटाईन सेंटरची उभारणी
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- शहरात कोरोनाचे रुग्ण वाढत असून मागील आठ दिवसांत शहरात १३३ रुग्ण वाढले आहेत. चार महिन्यांच्या तुलनेत शहरात आठ दिवसांत सर्वाधिक १२५ सक्रिय रुग्ण वाढले आहेत. रुग्णांच्या संपर्कातील संशयितांना आता क्वारंटाईन केले जाणार असून त्यासाठी केगाव येथील पोलिस प्रशिक्षण केंद्रात क्वारंटाईन सेंटर उभारले जात आहे. दुसरीकडे पॉझिटिव्ह रुग्णांवरील उपचारासाठी शहरातील वाडीया हॉस्पिटलमध्ये कोविड केअर सेंटर सुरु केले जात आहे. शहरात आठ दिवसांत पाच हजार २१३ संशयितांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. त्यात आता रुग्ण वाढू लागले आहेत. संसर्ग वाढणार नाही, याची खबरदारी घेत महापालिकेने आता क्वारंटाईन सेंटर व कोविड केअर सेंटर उभारणीचा निर्णय घेतला आहे. वाडीया हॉस्पिटलमध्ये पहिल्या टप्प्यात १०० बेड्स उपलब्ध असणार आहेत. दुसरीकडे बॉईज हॉस्पिटलमध्येही कोरोना रुग्णांवरील उपचाराची सोय केली जाणार आहे. दरम्यान, रुग्ण वाढत असतानाच महापालिकेला वाढीव डॉक्टरांची गरज भासणार आहे. संशयितांचे टेस्टिंग, कॉन्टॅक्ट ट्रेसिंगसाठी मनुष्यबळ लागणार आहे.
या पार्श्वभूमीवर पहिल्या टप्प्यात दहा डॉक्टर आणि २० वैद्यकीय कर्मचाऱ्यांची कंत्राटी तत्त्वावर नियुक्ती केली जाणार आहे. तत्पूर्वी, मक्तेदाराच्या माध्यमातून डॉक्टरांची भरती करण्यासंदर्भात प्रशासनाने यापूर्वी निर्णय घेतला होता. मात्र, त्याला विरोध झाल्यानंतर महापालिका आयुक्तांनी तो निर्णय मागे घेतला आहे. आता महापालिकेच्या माध्यमातून कंत्राटी डॉक्टरांची नियुक्ती केली जाणार आहे.
0 Comments