सोलापूरात 31 एसटी कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटिसा; 11 बडतर्फ
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांचा संप अद्यापही सुरूच असून, आता महामंडळ प्रशासनाने संपकरी कर्मचाऱ्यांवर बडतर्फीची कारवाई सुरू केली आहे. सोलापूर विभागातील आतापर्यंत 11 कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्यात आले आहे. यात सोलापूर आगारातील आठ तर पंढरपूर आगारातील तीन कर्मचाऱ्यांचा समावेश असून, 31 कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली असल्याची माहिती यावेळी एसटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी 'सकाळ'शी बोलताना दिली.
एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण करावे या मुख्य मागणीसाठी राज्यातील एसटी महामंडळाचे कर्मचारी ता. 27 ऑक्टोबरपासून संपावर गेले आहेत. कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे एसटीची प्रवासी वाहतूक सेवा ठप्प झाली आहे. जिल्ह्यातही आंदोलन सुरू आहे. त्यामुळे एसटी बस सेवा ठप्प आहे. परिवहनमंत्र्यांनी केलेल्या वेतनवाढीच्या घोषणेनंतर काही चालक-वाहक कामावर रुजू झाले. त्यांच्यावरच एसटीची दोन ते तीन टक्के प्रवासी वाहतूक सेवा सुरू झाली असली तरी परजिल्ह्यातील बससेवा मात्र अद्यापही ठप्पच आहे. तब्बल दोन महिन्यानंतरही कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत यशस्वी निर्णय निघाला नाही.
दरम्यान महामंडळ प्रशासनाने कर्मचार्यांवर कारवाईचे अस्त्र उगारले आहे. सोलापूर विभागात एकूण 9 आगार आहेत. विभागात एकूण 3 हजार 900 कर्मचारी आहेत. यातील सहाशे कर्मचारी कामावर रुजू झाले असून, उर्वरित सर्व कर्मचारी आंदोलनात सहभागी झाले आहेत. बडतर्फीची कारवाई मंडळाकडून सुरू असून, 31 कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. या कर्मचाऱ्यांकडून खुलासा मागविण्यात आला आहे. त्यामुळे आणखी 31 कर्मचाऱ्यांवर बडतर्फीची टांगती तलवार आहे.
एसटी महामंडळ कर्मचाऱ्यांचा संप सुरू झाल्यानंतर एसटी मंडळाच्यावतीने विविध पद्धतीने कारवाई करण्यात आली आहे. आतापर्यंत 377 कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे रोजंदारी तत्वावर कामावर असलेल्या 28 जणांना सेवा समाप्तीची कारवाई करण्यात आली आहे. शिवाय 400 कर्मचाऱ्यांच्या विविध आगारात बदल्या करण्यात आल्या आहेत.
0 Comments