गिरीश कुबेर सोलापूरात आल्यास चपलांचा हार घालणार- संभाजी आरमार चा इशारा
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- गिरीश कुबेर या लेखकाचे 'रेनेसन्स स्टेटस- द अनरिटन स्टोरी ऑफ द मेकिंग ऑफ महाराष्ट्रा' हे पुस्तक काही महिन्यांपूर्वी प्रकाशित झाले आहे. सदर पुस्तकामध्ये लेखकाने छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना बाजीराव पेशवे यांच्याशी केलेली आहे. तसेच छत्रपती संभाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह बदनामीकारक भावना दुखावणारे लिखाणही केले आहे. छत्रपती संभाजी महाराजांनी आपल्या मातोश्री राणी सोयराबाई यांचा व ब्राह्मण मंत्र्यांचा खून केला तसेच छत्रपती संभाजी महाराजांकडे राजकीय कौशल्याचा अभाव होता. छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास स्वामी यांचा गुरु-शिष्य संबंध जोडण्याचा अनऐतिहासिक प्रयत्न केलेला आहे. तसेच छत्रपती संभाजी महाराजांचे पुत्र छत्रपती शाहू महाराज यांच्याकडे राजकीय दूरदृष्टीचा अभाव होता अशी संदर्भहीन मांडणीही केलेली आहे. याबरोबरच बाजीराव पेशवे यांची तुलना हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी जातीय द्वेषभावनेतुन केलेली आहे. गिरीश कुबेर यानी वर्णवर्चस्ववादी भावनेतून जगभरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि शंभुपुत्र शाहू महाराज यांची बदनामी करण्याच्या व जातीय /धार्मिक तेढ वाढविण्याच्या उद्देशाने जाणीवपूर्वक हेतुपुरस्सरपणे हे पुस्तक लिहिले आहे. या पुस्तकामुळे छत्रपती घराण्यासोबतच हिंदुस्थानच्या जाज्वल्य इतिहासाला बदनाम करण्याचे राष्ट्रविरोधी कृत्य केले आहे. गिरीश कुबेर याच्या या बदनामीकारक लिखाणामुळे भावना दुखावल्या बद्दल संभाजी आरमारच्या वतीने दि.
२५/५/२०२१ रोजी मा. पोलीस निरीक्षक फौजदार चावडी पोलिस स्टेशन येथे रीतसर फिर्यादी अर्ज दाखल केला होता.
गिरीश कुबेर याच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई व्हावी म्हणून आंदोलनास परवानगी मागणी केली असता पोलिस प्रशासनाने आंदोलनास परवानगी देखील नाकारली होती. एकंदर पोलिस प्रशासन आणि राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे करोडो जनतेच्या श्रद्धास्थानावर बदनामीचे वार करून ही गिरीश कुबेर मोकटच आहे. त्यामुळेच नाशिक येथील साहित्य संमेलनामध्ये संतप्त शिवभक्तांनी कुबेर याच्या विरोधात आंदोलन केले आहे. सरकारनी वेळीच पुढाकार घेतला असता तर हा प्रसंग टाळता आला असता. मात्र इतके होऊन ही कुबेर याच्यावर कोणतीही कायदेशीर कारवाई झाली नाही. १० डिसेंबर रोजी सोलापुरातील छाया- प्रकाश फाउंडेशनच्या वतीने गिरीश कुबेर याला पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. अश्या विकृत मनोवृत्तीच्या लेखकाला पुरस्कार देणे अत्यंत निंदनीय व निषेधार्थ आहे. दि.१० डिसेंबर रोजी गिरीश कुबेर उपस्थित राहिल्यास संभाजी आरमार चपलांचा हार घालून गिरीश कुबेर याला त्याची जागा दाखवून देईल. ही घटना टाळायची असल्यास पोलीस प्रशासनाने गिरीश कुबेर याच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करावी. त्यासोबतच अश्या विकृत व्यक्तीला पुरस्कार देण्याचा निर्णय संबंधित फाऊंडेशन ने मागे घेऊन शिवप्रेमी जनतेच्या भावना दुखावणार नाहीत याची खबरदारी घ्यावी असे आवाहन संभाजी आरमाराच्या वतीने करण्यात आले. या पत्रकार परिषदेस जिल्हा प्रमुख गजानन जमदाडे, शशिकांत शिंदे, संजय सरवदे, अनिल छत्रबंद, सोमनाथ मस्के, मल्लिकार्जुन पोतदार आदी उपस्थित होते.
0 Comments