कोरोनाला वरदान समजत हे सरकार दोन वर्षे सत्तेत टिकले
मुंबई (नचिकेत पानसरे):- कोरोना,ओमायक्रोनचा प्रसार होत असेल तर कडक निर्बंध लादले पाहिजेत. काळजी घेतलीच पाहिजे, याबाबत दुमत असण्याचे कारण नाही. परंतु लोका सांगे ब्रह्मज्ञान आणि स्वत: कोरडे पाषाण अशी राज्य सरकार आणि मंत्र्यांची रीत झाली आहे, अशी टिका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी केली. प्रसारमध्यमांशी बोलताना दरेकर पुढे म्हणाले की, कोरोनाला वरदान समजत हे सरकार दोन वर्षे सत्तेवर टिकले, कुठल्याही प्रकारची विकासकामे, लोकांच्या हिताची काळजी घेतली नाही. तसे ओमायक्रोन सत्ता टिकवण्याला वरदान आहे, असे समजून केवळ निर्बंध नको तर लोकांसाठी उपाययोजनाही असायला हव्यात. सरकारी पक्षाचे मेळावे, सरकारी पक्षाचे कार्यक्रम, मालवण महोत्सव किंवा वंडरलँड स्वत: पर्यावरण मंत्री करत असतील तर त्यांना दुसऱ्यांना तसे सांगण्याचा नैतिक अधिकार पोहोचत नाही, असेही दरेकर यांनी सांगितले. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. बँका या अर्थव्यवस्थेचा कणा आहेत. भरदिवसा बँकेमध्ये घुसून, गोळीबार करून पैसे लुटले जात असतील, तर याच्यापेक्षा भयंकर दुसरे काहीही नाही, अशी प्रतिक्रिया दरेकर यांनी व्यक्त केली.दहिसर येथील स्टेट बॅंक ऑफ इंडियाच्या शाखेवर पडलेल्या सशस्त्र दरोड्याच्या घटनेनंतर स्टेट बॅंकेच्या दहिसर शाखेला भेट दिली. त्यानंतर प्रसारमध्यमांशी बोलताना दरेकर म्हणाले की, दरोडेखोरांनी आत घुसून गोळीबार केला.कॅशियरच्या गल्ल्यातील पैसे काढत पोबारा केला.दरेकर यांनी पोलिसांचेदेखील अभिनंदन केले कारण पाच-सहा तासात दरोडेखोरांना त्यांनी पकडले.बँक अशा पद्धतीने जर लुटायला लागले, तर या शहराची आर्थिक घडीच उद्ध्वस्त होईल.या बॅंकेला एक गार्ड असण्याची आवश्यकता होती.कारण स्टेट बँक देशातील मोठी बँक आहे.परंतु बँकेची धोरणे जर कर्मचाऱ्यांच्या, ग्राहकांच्या जीवावर येणार असतील तर ती बदलण्याची आवश्यकता आहे, असेही दरेकर म्हणाले.याबाबतची विनंती केंद्रीय अर्थमंत्री, राज्यमंत्री यांना करणार असल्याचे ते म्हणाले. तसेच राज्याचे गृहमंत्री वळसे पाटील यांची बैठक लावून आज बँकांच्या शाखा अशा प्रकारे गोळीबार करून लुटल्या जात असतील तर ते अत्यंत चिंताजनक, धोकादायक आहे. म्हणून आणखी कडक आणि गतीने काय करता येईल यासंबंधी गृहमंत्र्यांशी बोलणार असल्याचे दरेकर यांनी सांगितले.
0 Comments