महाराष्ट्र लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर नवाब मलिक,दिलीप वळसे पाटील यांचे स्पष्ट संकेत
मुंबई (नचिकेत पानसरे):-आठवडाभरात राज्यातील ओमायक्रॉन आणि कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत असताना राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक आणि राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी लॉकडाऊन शिवाय पर्याय नसल्याचे सांगत लॉकडाऊनचे स्पष्ट संकेत दिले आहेत . राज्यातील वाढत्या रूग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना विचारले असता, नागरीकांकडून अद्यापही ठिकठिकाणी गर्दी करण्याचे प्रकार सुरुच आहेत. त्यातच ओमायक्रॉन आणि कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढही होत आहे. त्यामुळे महाराष्ट्राची वाटचाल लॉकडाऊनच्या दिशेने होत असल्याचे मत व्यक्त केले. राज्यात वाढत्या रुग्णसंख्या पाहता ठाकरे सरकारने निर्बंध लावले. मात्र अद्यापही सर्वसामान्यांकडून नियमांचं पालन होत नसल्याने हे निर्बंध अजून कठोर करण्यात येणार असल्याचा इशारा देत वाढत्या रुग्णसंख्येला आळा घालण्यासाठी अनेक राज्यांनी कठोर निर्बंध लावले असून महाराष्ट्रातही ती वेळ येण्याची शक्यता आहे. वेळ पडली तर राज्यात लॉकडाउन लागू शकतो असा इशारा गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी दिला. त्यामुळे सरकारने जरी नवीन वर्षाचं उत्साहात स्वागत करायचं असेल तरी काळजी घेण्याची गरज असल्याचे स्पष्ट केले आहे. प्रत्येकाने आपला आनंद, उत्साह घरात राहूनच साजरा करावा. सार्वजनिक ठिकाणी येणं टाळावं आणि करोनाच्या वाढीला हातभार लावू नये. प्रत्येकाने आपली आणि कुटुंबाची काळजी घेतली पाहिजे असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. सरकारने जे काही निर्बंध घालून दिले आहेत त्यांचं पालन झालं नाही आणि उद्या करोनाचा प्रादुर्भाव वाढला तर लॉकडाउनपर्यंत जावं लागेल, त्याशिवाय पर्याय नाही. सरकारच्या मनात लॉकडाउन लावण्याचा विचार नाही, पण परिस्थितीप्रमाणे निर्णय़ घ्यावा लागेल असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. ३१ डिसेंबरच्या सर्व मोठ्या पार्ट्यांना प्रतिबंध घालण्यात आला आहे. यासंबधी नियमावली जाहीर करण्यात आली असून त्याचे पालन झालं पाहिजे. तसेच लग्नातील राजकीय नेत्यांच्या गर्दीवर बोलताना त्यांनी मोठे नेते, सामान्य व्यक्ती सर्वांनीच कोरोनाच्या नियमाचं पालन करण्याची गरज असल्याचे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले. दरम्यान, ३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर गृह विभागाकडून मार्गदर्शक तत्वे जाहीर केली असून या तत्वांनुसार मिरवणूका काढणे, फटाके फोडणे, गर्दी करणारे कार्यक्रम आयोजित करणे आदी गोष्टींवर निर्बंध घालण्यात आले आहेत.
0 Comments