Hot Posts

6/recent/ticker-posts

नवीन वर्षात सोलापूरकरांच्या पाण्याचा प्रश्न मिटणार?

 नवीन वर्षात सोलापूरकरांच्या पाण्याचा प्रश्न मिटणार?



निविदा प्रक्रियेतील १८ कामे पूर्ण करण्याचाही स्मार्ट सिटी कंपनीचा निर्धार  

सोलापूर (कटूसत्य वृत्त):- केंद्र शासनाने स्मार्ट सिटीतून सोलापूर शहर स्वच्छ, सुंदर व पर्यावरणपूरक बनविताना शहरातील मुलभूत सुविधांनादेखील प्राधान्य दिले आहे. गेल्या वर्षभरात एबीडी एरियातील कामे समाधानकारक असली तरी शहरवासियांचा जिव्हाळाचा पाणीप्रश्‍न कायम राहिला आहे. येत्या वर्षात चालू व निविदा प्रक्रियेतील १८ कामे पूर्ण करण्याबरोबर  सोलापूरकरांच्या पाण्याचा प्रश्न मिटविण्याचा संकल्प स्मार्ट सिटी कंपनीने केला आहे.
केंद्र शासनाकडून सोलापूर शहराला दोन उड्डाणपुलांसहित तब्बल दोन हजार कोटी रुपयांचा निधी स्मार्ट सिटी योजनेंतर्गत मंजूर करण्यात आला. शहराचा ठराविक भाग मॉडेल बनविण्यासाठी विशिष्ट हेतूने स्मार्ट सिटी कंपनी उदयास आली. त्यासाठी केंद्र व राज्य शासनाकडून वेळोवेळी भरभरून निधीदेखील उपलब्ध झाला. या स्मार्ट कामांमध्ये रंगभवनच्या स्मार्ट चौकापासून ते समांतर जलवाहिनी आदी ५६ कामांचा समावेश होता. रंगभवन रस्ते, होम मैदान, स्ट्रीट लाईट, श्री सिध्देश्‍वर तलाव सुशोभिकरण, इंदिरा गांधी स्टेडिअम, पथदिवे, शासकीय इमारतींवर सोलार सिस्टिीम यांसह गावठाण परिसरात ८४ कि.मी. अंतराची जुनी व जीर्ण झालेली जनवाहिनी व ड्रेनेजलाईन बदलून नव्याने टाकण्यात आली.
त्यावर सिमेंट काँक्रीटचे रस्तेही बनविण्यात आले. शहर स्मार्ट बनविताना या मुलभूत सुविधांही पुरविण्यात आल्या आहेत. परंतु, महापालिका आयुक्‍त आणि स्मार्ट सिटी सीईओ या दोन अधिकाऱ्यांच्या इगोमुळे शहराच्या विकासाला ब्रेक लागला. मोठ्या प्रमाणात निधी येऊनदेखील मुदतीत शहराचा विकास साधता आला नाही. संपूर्ण सोलापूरसह एनटीपीसी परिसरातील तीन गावचे लक्ष लागून राहिलेली समांतर जलवाहिनीदेखील पूर्णत्वास आली नाही. मुख्य बाजारपेठेतील रस्त्यांना अमृत योजनेच्या कामांमुळे विलंब झाला. महापालिका प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे अमृत योजनेचे काम रखडले आणि १३ वर्षांच्या मुलाला आपला जीव गमवाला लागला. रणजी मॅचेसच्या दर्जाचे स्टेडिअम तयार झाले. परंतु खेळाडूंच्या उपयोगातच आले नाही. ॲडव्हेंचर पार्क बनविले पण तेही श्रेयवादात दोन वर्षांपासून धूळ खात पडल्याने लोकार्पणापूर्वीच त्याची दुरवस्था झाली. स्ट्रीट बाजाराचा लिलाव झाला, वस्तू प्रदर्शनाऐवजी विक्रीसाठी गाळे भाड्याने दिल्याने त्याचा मूळ उद्देश नष्ट झाला. स्मार्ट सिटी योजनेतून कोट्यवधी रुपये खर्चून शहर स्मार्ट केले खरे, होममैदान परिसर वगळता सोलापूरकरांना कोणताही फायदा झाला नाही.
दोन अधिकाऱ्यांची मनमानी थांबविण्यासाठी स्मार्ट सिटीचे मुख्य समन्वयक सचिव असीम गुप्ता यांना मध्यस्थी करावी लागली. परंतु या सर्व गोंधळात सोलापूकरांचे मात्र भरून न निघणारे नुकसान या वर्षभरात झाले. मागील चुकांमध्ये दुरुस्ती करून येत्या नवीन वर्षात सोलापूरकरांची तहान भागविण्याचा निर्धार संकल्प स्मार्ट सिटी कंपनीने केला आहे.
स्मार्ट सिटी अंतर्गत शहरातील अनेक प्रकल्पाची दुसऱ्या टप्प्यातील कामे तर काही नव्याने सूचविलेली कामे अशी एकूण १८ कामे या येत्या वर्षात पूर्ण करावयाची आहेत. प्रस्तावित सर्व कामे मुदतीत करून घेण्याचा नव्या वर्षाचा संकल्प आहे. शहराचे वॉटर ऑडिट सुरू आहे. त्यात प्रामुख्याने समांतर जलवाहिनी हा सोलापूकरांचा जिव्हाळ्याचा विषय आहे. तोही प्रकल्प या वर्षात मार्गी लागेल.
- त्र्यंबक ढेंगळे-पाटील, सीईओ, स्मार्ट सिटी

Reactions

Post a Comment

0 Comments