बार्शीत माजी नगरसेवकाच्या घरावर गोळीबार
बार्शी(कटूसत्य वृत्त):- बार्शी नगरपालिकेचे माजी नगरसेवक विनोद वाणी यांच्या सुभाषनगर भागातील वाणी प्लॉट येथील घरावर गुरुवारी (ता. २ डिसेंबर) मध्यरात्री बाटल्या, दगडफेक करुन गोळीबार करण्यात आला. एक जीवंत काडतूस व एक रिकामे झालेले काडतूस बंगल्याच्या आवारात सापडले आहे. बार्शी शहर पोलिसांत चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांना अटक करण्यात आली आहे.नागेश चव्हाण, सोमा कदम अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. सोन्या हाजगुडे, विपुल यादव अशी गुन्हा दाखल झालेल्या इतर दोघांची नावे आहेत. माजी नगरसेवकांचे बंधू विशाल वाणी यांनी याबाबतची फिर्याद दिली आहे. बार्शी नगरपरिषदेचे माजी नगरसेवक विनोद वाणी यांचे बंधू विशाल वाणी यांचा मित्र विकी जाधव याच्याशी विपुल यादव याचे 29 नोव्हेंबर रोजी भांडण झाले होते. हे भांडण विशाल वाणी यांनी आपापंसात मिटवले होते. मात्र, गुरुवारी मध्यरात्री चौघांनी येऊन घरावर बाटल्या तसेच दगडफेक करीत, ‘वाणी घराबाहेर ये’, अशी धमकी देत शिवीगाळ करुन आणलेल्या पिस्टनमधून गोळीबार केला. त्यातून एक गोळी झाडली, तर एक जीवंत काडतूस बंगल्याच्या आवारात सापडले आहे, ते पोलिसांच्या ताब्यात दिले आहे, असे फिर्यादीत म्हटले आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक स्वप्निल इज्जपवार तपास करीत आहेत. दरम्यान, माजी नगरसेवक विनोद वाणी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, भाऊ विशाल टीव्ही पहात बसला होता. घरासमोर येऊन समाजकंटकांनी बिअरच्या बाटल्या फोडल्या, दगडफेक केली. गेटवरुन चढून घरात येण्याचा प्रयत्न केला. तसेच, शिवीगाळ करीत पिस्टनमधून गोळीबारही केला. दोन फायर केल्यानंतर एक रिकामे काडतूस, तर एक जिवंत काडतूस सापडले आहे. पोलिसांना फोन करताच ते दहा मिनिटांत आले; तोपर्यंत हल्लेखोर पळून गेले होते. पोलिसांच्या ताब्यात काडतूस देण्यात आले आहे. ही घटना राजकीय असून याचा सूत्रधार कोण आहे. हे पोलिस तपासातून निष्पन्न होईल. तपास योग्य दिशेने सुरु असून पोलिस उपअक्षीक्षक, निरीक्षक घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली आहे. संपूर्ण तपास करुन न्याय द्यावा, अशी आमची मागणी आहे, असे विनोद वाणी यांनी स्पष्ट केले.
0 Comments