छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या चबुतर्याचे काम पूर्ण ; उद्या होणार उद्घाटन
सांगोला (कटूसत्य वृत्त):- सांगोला नगरपरिषदेच्या वतीने छ.शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या चबुतर्याचे काम पूर्ण करण्यात आले असल्याकारणाने या कामाचे उद्घाटन नगरपरिषद पदाधिकारी व प्रशासनाच्या वतीने करण्यात येणार असून त्याबाबत कोणीही राजकारण करू नये असे मत नगरपरिषद पदाधिकार्यांनी व्यक्त केले आहे.
शहरामध्ये छ.शिवाजी महाराज चौक या ठिकाणी छ. शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभा करण्यात यावा, अशी सन 1985 पासून शिवप्रेमींची मागणी होती. पण आजपर्यंतच्या कोणत्याही पदाधिकार्यांनी हे काम करण्यामध्ये स्वारस्य दाखविले नाही. त्यामुळे विद्यमान पदाधिकार्यांनी ठराव करून त्याठिकाणी 2014 पासून असणारे गाळ्यांचे आरक्षण उठवून त्यामधील 135 चौ.मी. एवढ्या जागेवर छ. शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा बसविण्याचा ठराव 2018 साली केला. त्यानंतर त्याचे प्रसिध्दीकरण करून त्यावर हरकती, सूचना मागविल्या आणि या चबुतर्याच्या कामासाठी सुमारे 19 लाख 51 हजार 592 रू. नगरपरिषद फंडातून खर्च करण्याचा ठराव विद्यमान पदाधिकार्यांनी केला. त्यानुसार हे काम पूर्ण झालेले आहे.
त्यामुळे उद्याचा छ. शिवाजी महाराजांच्या चबुतर्याच्या उद्घाटनाचा कार्यक्रम हा नगरपालिका प्रशासनाचा असून समस्त शिवप्रेमींना विचारूनच हा कार्यक्रम आयोजित केला गेला आहे. छ.शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या चबुतर्याचे काम पूर्ण झालेले असून पुतळ्याचे काम जरी अर्धवट असले तरी नगरपरिषदेमार्फत चबुतर्याच्या कामासाठी निधी खर्च करण्यात आलेला असून त्याचे उद्घाटन करण्याचा अधिकार नगरपरिषद प्रशासन व पदाधिकारी यांचा असून शिवप्रेमी मंडळाची त्यासाठी कसलीही हरकत नाही.
- अरविंद केदार, शिवप्रेमी मंडळ सांगोला.फार वर्षापसून प्रलंबित असलेला छ. शिवाजी महाराजांंचा अश्वारूढ पुतळ उभारणी कामात आतापर्यंत ठोस असे काहीच झाले नव्हते. खरी लढाई सभागृहात होती पण आताच्या सर्व विद्यमान नगरपालिका सदस्यांनी सभागृहामध्ये सर्व अडचणींवर मात करत सर्वानुमते हा विषय मार्गी लावण्याचे ठरविले. त्यासाठी तत्कालीन मुख्याधिकारी सौ. प्रज्ञा पोतदार व विद्यमान मुख्याधिकारी कैलास केंद्रे व नगरपालिका प्रशासनाची मोलाची साथ मिळाली. सध्या नगरपालिका सभागृहामध्ये आणि बाहेर आमच्यासारखे ठाम व कणखर शिवप्रेमी मंडळी आहेत, त्यामुळे संबंधित जागेतील गाळ्याचे आरक्षण रद्द करून छ. शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे आरक्षण मंजूर करून घेण्यात आम्ही यशस्वी झालो आणि पुतळा उभारणीच्या कामाला खर्या अर्थाने गती मिळाली. आज आपल्याला हा पुतळा उभारणीचा चबुतरा दिसतोय, हे या नगरपरिषदेच्या विद्यमान सदस्यांची छत्रपती शिवाजी महाराजांप्रती असलेली निष्ठा आणि आदर दर्शविणारी आहे. मी स्वतः एक शिवप्रेमी नगरसेविका म्हणून आम्ही आमची सभागृहातली जबाबदारी अतिशय नियोजनबध्द व योग्य रितीने पार पाडली आहे. आता समस्त शिवप्रेमींच्या सहकार्याने लवकरच या चबुतर्यावर महाराजांचा पुर्णाकृती अश्वारूढ पुतळा मोठ्या दिमाखात उभारला जाईल.
0 Comments