Hot Posts

6/recent/ticker-posts

प्रशासकीय कामकाज लोकाभिमुख होण्यासाठी कर्मचाऱ्यांमध्ये स्वयंशिस्त महत्त्वाची : बेडसे - पाटील

 प्रशासकीय कामकाज लोकाभिमुख होण्यासाठी कर्मचाऱ्यांमध्ये स्वयंशिस्त महत्त्वाची : बेडसे - पाटील


हेलपाटेमुक्त गतिमान प्रशासन देण्याचा प्रयत्न करू..
नूतन तहसीलदार प्रशांत बेडसे -पाटील यांची मोहोळ तालुकावासियांना ग्वाही


मोहोळ (कटूसत्य वृत्त):- प्रशासन हे लोकाभिमुख असावे त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये आणि अधिकार्‍यांमध्ये स्वयंशिस्त महत्त्वाची असते. सर्वसामान्यांशी गावपातळीवरील कर्मचारी असो अथवा कार्यालयातील शासकीय कर्मचारी सर्वांनी सौजन्याने वागावे. शासकीय नियमात ठरवून दिलेल्या वेळेत दाखले आणि उतारे सामान्यांना मिळायला हवेत. प्रथम वेळी चुकल्यास सुधारण्याची नक्कीच संधी देऊ मात्र सातत्याने कामात हलगर्जीपणा आणि बेजबाबदारपणा अजिबात खपवून घेतला जाणार नाही. असा इशारा मोहोळचे नूतन नवनियुक्त तहसीलदार प्रशांत बेडसे -पाटील यांनी दिला. मोहोळ तालुक्यात महसूल विभागाच्या वतीने गतिमान प्रशासन देण्याबरोबर शेतकरी बांधवांना दिलासा मिळेल असे उपक्रम राबवून मोहोळ महसूल विभाग हा जास्तीत जास्त लोकाभिमुख कसा होईल यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहू. अशी ग्वाही देखील मोहोळचे नूतन तहसीलदार प्रशांत बेडसे -पाटील यांनी मोहोळमध्ये पदभार स्वीकारल्यानंतर उपस्थितांना दिली.
मोहोळ महसूल प्रशासनाचे सर्वेसर्वा असलेल्या तहसीलदारपदी चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा येथून बदलून आलेले प्रशांत बेडसे पाटील यांची नियुक्ती झाली होती .बेडसे यांनी मोहोळच्या तहसीलदार पदाची सूत्रे मंगळवारी दुपारी तीन वाजता स्वीकारली. मोहोळचे प्रभारी तहसीलदार राजशेखर लिंबारे यांनी त्यांचे स्वागत करत त्यांना तहसीलदार पदाचा पदभार सुपूर्द केला. यावेळी प्रभारी तहसीलदार राजशेखर लिंबारे, निवासी नायब तहसीलदार भालचंद्र यादव, नायब तहसीलदार लीना खरात यांच्यासह मोहोळ महसूल मधील कर्मचाऱ्यांकडूनही स्वागत स्वीकारून विविध कामांचा आढावा घेतला. त्याचबरोबर मोहोळ तहसील कार्यालयाच्या इमारतीचे विविध विभागांची पाहणी करून कामाची माहिती घेतली.
गौण खनिज मोहिमेमुळे पश्चिम महाराष्ट्रात बेडसे - पाटील यांचा दबदबा..
तहसीलदार प्रशांत बेडसे -पाटील हे दौंड, पिंपरी चिंचवड येथे नियुक्तीस असताना गौण खनिजाच्या चोरी विरोधात त्यांनी राबवलेली मोहीम संपूर्ण राज्यात पथदर्शी ठरली. एकाच दिवसात तब्बल साडेतीन कोटीची दंडात्मक कारवाई यांनी केली होती. त्यामुळे त्यावेळी पुणे जिल्ह्यातील बांधकाम लॉबीला बेडसे यांनी मोठा हादरा दिला होता. तत्कालीन पुणे जिल्हाधिकारी प्रशासनाने नियुक्त केलेल्या गौण खनिज चोरी विरोधी मोहिमेचे नेतृत्व त्यांनी केल्याने पुणे जिल्ह्यासह संपूर्ण पश्‍चिम महाराष्ट्रात शिस्तप्रिय तहसीलदार म्हणून बेडसे -पाटील यांच्या शिस्तीच्या पटर्नची ख्याती सर्वश्रुत आहे. बेडसे यांच्या मोहोळच्या नियुक्तीमुळे मोहोळ तालुक्यातील वाळू चोरीस मोठा पायबंद बसणार आहे. त्यामुळे वाळू माफियांचे धाबे दणाणले आहे.
नूतन तहसीलदार प्रशांत बेडसे -पाटील यांनी माजी आमदार राजन पाटील यांची भेट घेऊन शुभेच्छा स्वीकारल्या. मोहोळचे विद्यमान आमदार यशवंत माने बाहेरगावी असल्याने त्यांच्याकडूनही बेडसे -पाटील यांनी भ्रमणध्वनीवरून शुभेच्छा स्वीकारल्या.नागपुर विभाग बदलून पुणे महसूल विभागात बदली झालेले बेडसे यांनी यापुर्वी महसूल विभागात उल्लेखनीय सेवा बजावली आहे.यापूर्वी बेडसे यांनी पुणे विभागातील दौंड, पिंपरी -चिंचवड, विदर्भात देखील जिवती, वरोरा येथे शिस्तबद्ध सेवा बजावली आहे. एक शिस्तप्रिय तहसीलदार म्हणून त्यांची महसूल विभागात अनेक वर्षापासून ख्याती असून मोहोळ तहसीलदार पदाची सूत्रे त्यांनी स्वीकारल्यामुळे त्यांच्या कार्यपद्धती बाबत कर्मचाऱ्यांसह सर्वसामान्यांमध्ये मोठी उत्सुकता आहे.

Reactions

Post a Comment

0 Comments