आजच्या शिक्षण व्यवस्थेतून आदर्श नागरिक घडणे हीच बापूसाहेबांना खरी श्रद्धांजली- डॉ. प्रदीप आवटे

सांगोला विद्यामंदिर मध्ये बापूसाहेब झपके यांचा ४0वा स्मृतिदिन संपन्न
सांगोला (कटूसत्य वृत्त):- वसा मिळणे खूप सोपे असते परंतु घेतलेला वसा न मातता न उतता तो जपणं खूप अवघड असते. सामाजिक कार्याचा व शैक्षणिक कार्याचा हा अवघड वसा बापूसाहेबांच्या पुढच्या पिढीने मनोभावे जपला आहे.आपल्या पलीकडे असणाऱ्या समाजाकडे आपल्याला पाहता येणे म्हणजेच शिक्षण होय.बापूसाहेबांचा स्मरण दिन हा केवळ स्मरण दिन न राहता तो प्रकाश दिन व्हावा,हीच संकल्पना खूप महत्त्वाची आहे.तूमच्या वर्गातल्या पोराला निखळ माणूस म्हणून वर्गाच्या बाहेर पडता येणे म्हणजेच शिक्षण होय. म्हणूनच आजच्या शिक्षण व्यवस्थेतून आदर्श नागरिक घडणे हीच बापूसाहेबांना खरी श्रद्धांजली ठरेल असे प्रतिपादन महाराष्ट्रातील प्रसिद्ध वक्ते व विचारवंत डॉ. प्रदीप आवटे यांनी केले.सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष, गांधीवादी,थोर स्वातंत्र्यसेनानी, शिक्षण महर्षी कै. गुरुवर्य बापूसाहेब झपके यांच्या ४० व वा स्मृती समारोह सांगता समारंभामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.यावेळी व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष व कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. प्रबुद्धचंद्र झपके उपस्थित होते.
पुढे बोलताना डॉ.आवटे म्हणाले की गांधीजींचा विचार हा आचरणात आणून जगण्याचे सार्थक करणे याच ध्येयाने स्वातंत्र्यलढ्याच्या संग्रामात सहभागी होणे हे बापूजी यांचे कार्य आजच्या समाजव्यवस्थेत साठी प्रचंड आदर्शवादी आहे.आजच्या शिक्षण प्रक्रियेतून केवळ गुणात्मक वाढीवरती भर देत स्पर्धेला अधिक महत्त्व दिले जात आहे. याहीपेक्षा विद्यार्थ्यांची भावनात्मक वाढ होणं हे शिक्षण व्यवस्थेचे ध्येय असायला हवे. यावेळी त्यांनी विविध प्रकारची उदाहरणे देत आजच्या प्रगल्भ शैक्षणिक दृष्टिकोनातून नागरिक कसा घडला जाईल याबाबत आपले चिंतन व्यक्त केले.
कै.गुरुवर्य बापूसाहेब झपके स्मृतिदिनानिमित्त सकाळी ७.००वा. जुना मेडशिंगी रोड येथील समाधी स्थळावर समाधी दर्शन व सामुदायिक प्रार्थना संपन्न झाली. त्यानंतर सकाळी ८.०० वाजता सांगोला विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेज सांगोला येथे संस्था सदस्या मंगलप्रभा कोरी यांचे हस्ते कै. बापूसाहेब झपके यांच्या तैलचित्रास पुष्पहार अर्पण करण्यात आला.
सांगता समारंभ प्रारंभी कै.बापूसाहेब झपके व कै.बाईसाहेब झपके यांचे प्रतिमेचे पूजन प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते करण्यात आले. सांगोला विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य भीमाशंकर पैलवान यांनी प्रास्ताविक व उपस्थितांचे स्वागत केले.लेखक सुनील जवंजाळ यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उन्मेष आटपाडीकर केले तर आभार प्रदर्शन कोळा विद्यामंदिर हायस्कूल व ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य नारायण विसापूरे यांनी केले.
या कार्यक्रमासाठी संस्थेचे सर्व पदाधिकारी, झपके कुटुंबीय व त्यांचे नातेवाईक, सेवानिवृत्त प्राचार्य, उपप्राचार्य, उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी,विविध संस्थांमधील पदाधिकारी, पत्रकार,प्रतिष्ठित नागरिक, पालक , विद्यामंदिर परिवारातील सर्व प्रशासकीय अधिकारी,शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, मोठ्या संख्येने उपस्थित होते.सदर सर्व कार्यक्रम कोवीड-१९ शासकीय नियमांचे पालन करून संपन्न झाले..
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना प्रा. प्रबुद्धचंद्र झपके म्हणाले की, कै. गुरुवर्य बापूसाहेब झपके यांनी संस्था स्थापन करत असताना जे आदर्श आम्हाला घालून दिलेले आहेत,त्याच आदर्शा नुसार व त्याच तत्त्वानुसार संस्थेची वाटचाल सुरू आहे. संस्कारक्षम विद्यार्थी घडवणे हेच ध्येय घेऊन आम्ही विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील आहोत.
0 Comments