संभाजी ब्रिगेड आग्या-मोहोळ आहे. पण... आम्ही युती/आघाडी करणार म्हटलं की बऱ्याच जणांच्या मनात आग लागली...

मोहोळ (कटूसत्य वृत्त):- चळवळ म्हटलं की विचारधारा सर्वोच्च असते. महापुरुषांच्या रूपात जुन्या लोकांनी दिलेले चांगले विचार लोकांमध्ये रुजवणे आणि ते चांगल्या पद्धतीने पुढे घेऊन जाणे हेच कार्यकर्ता म्हणून सर्वांचे कर्तव्य आहे. समाज जागृत व्हावा, लोकांचे प्रबोधन व्हावे... हा त्यामागील प्रामाणिक विचार असतो. प्रबोधनाच्या चळवळीत कुणीही मोठा किंवा लहान नसतो, तो समाजासाठी आपले संपूर्ण आयुष्य मातीत घालतात. यातूनच हाडाचा कार्यकर्ता निर्माण होतो. एक एक माणूस आपल्या सोबत यावा, सोबत चळवळीत काम करावं म्हणून काही कार्यकर्ते संपूर्ण आयुष्य चळवळीसाठी घालवतात. अशाच लोकांकडे राजकीय सत्ता नसते. स्वतःच्या घरावर तुळशीपत्र ठेवून समाजाचा विकास किंवा समाजाचं भलं व्हावं म्हणून ते काम करत असतात. महापुरुषांनी दिलेले विचार तर क्रांतिकारी आहेत. परंतु सगळ्या समाजानं जर ते स्विकारले तर परत एकदा सामाजिक क्रांती झाल्याशिवाय राहणार नाही. परंतु आम्ही लांबून लांबून सगळं बघतो, त्यामुळे आम्हाला काहीही देणघेणं नसतं. आम्ही पेटून उठत नाही, संघर्ष करत नाही, व्यवस्थेच्या विरोधात लढा देत नाही. फक्त लांबून तमाशा बघतो आणि याचाच फायदा घेऊन इथली बधीर झालेली राजकीय लाचार व्यवस्था आमचा फक्त 'युज अँड थ्रो...' करते. तरीही आम्ही शांत असतो. सामाजिक चळवळीत वैचारिक क्रांती घडवण्यासाठी आमचा जन्म झाला आहे असे आम्हाला काम करताना वाटतं. परंतु आमची वैचारिक क्रांती झाली तरी सामाजिक आणि राजकीय क्रांती करण्यासाठी आम्ही फक्त दुसऱ्याच्या सतरंज्या उचलण्यात किंवा वेट बिगारी करण्यात धन्यता मानतो. आम्ही फक्त त्यांना आमच्या विचाराचे म्हणतो, ते मात्र आमचा फक्त वापर करतात ते आम्हाला कधीच कळत नाही. मग गैरसमज कसला. लढणारी यंत्रणा कधीच गैरसमजात जगत नसते. भाकड चर्चा काही कामाची नसते.
संभाजी ब्रिगेड' राजकीय तडजोडी करण्यासाठी इतर राजकीय पक्षांशी हात मिळवणी करून सत्तेची भागीदार झाली पाहिजे असं आम्हाला वाटतं. परंतु तुम्हाला काय हे वाटत आणि पटत नाही. काँग्रेस, राष्ट्रवादी, सेना, भाजप यांनी घाणेरड्या युती किंवा आघाड्या केल्या तरी चालतात. मात्र आम्ही चर्चा करायला गेलो तर यांच्या तोंडावर बारा वाजता. आम्ही आमची रेषा मोठी ओढली तर कुणाच्या पोटात दुखायची काहीच गरज नाही. परिवर्तन अटळ आहे. प्रत्येकाला सत्तेचा वाटा मिळाला पाहिजे. त्यासाठी संघर्ष करणे, वळवळ करणे, धडपड करणे हा निसर्गाचा नियम आहे. मात्र तुम्ही आम्हाला फक्त गृहीत धरता आणि दाराच्या बाहेर उंबऱ्या जवळ ठेवता हे चालणार नाही. आमचा मार्ग आम्ही तयार करू...!! यापुढे आमच्या हातात आमच्याच विचारांचा झेंडा आणि दांडा असेल. त्यावर आम्ही कुणाशीही हातमिळवणी करू...! सत्तेची गणित बदलल्याशिवाय राहणार नाही. हे मात्र उघड सत्य आहे. कार्यकर्त्यांचा विकास हीच संभाजी ब्रिगेड ची जबाबदारी आहे.
राजकारणात कुणीही स्पृश्य-अस्पृश्य नसतं. पहाटेच्या शपथेपासून सुरू झालेला प्रवास महाविकासआघाडी पर्यंत येऊन थांबतो आणि पुलोद, माधव पॅटर्न पासून सुरू झालेला प्रवास सुती पर्यंत येऊन थांबतो... हे महाराष्ट्राला वेगळं सांगायची गरज नाही. कालचे कट्टर मित्र वैरी होतात, शत्रू उद्या मित्र नातेवाईक होतात. मग विचार आणि कार्यकर्ता जिवंत ठेवण्यासाठी व कार्यकर्त्यांच्या हितासाठी, महाराष्ट्राच्या भल्यासाठी जर तडजोडी केल्या तर बिघडलं कुठं...!
उपाशीपोटी क्रांती होत नसते. आजपर्यंत फाटक्या लोकांनीच क्रांती केलेले आहे. मा. पुरुषोत्तम खेडेकर साहेब यांच्यासह आमच्या प्रत्येक नेत्याने फाटकी माणसं जोडली. त्यांच्या डोक्यात विचारांची क्रांती निर्माण करून संघर्ष करणारी जमात निर्माण केली. व्यवस्थेची चिकित्सा हा आमचा विश्वास आहे. खरं सत्य हेच आम्ही स्वीकारणार आणि इतरांना इतरांना सांगणार. म्हणून तर लाखो कार्यकर्ते घडले, हजारो कार्यकर्ते जाहीर बोलायला लागले हीच वैचारिक क्रांती असते. मात्र फाटके लोक व्यवस्था निर्माण करू शकत नाही. कारण त्यांना ''रसद' आवश्यक असते. सत्तेची नशा ही फार महत्त्वाची असते. त्यामुळे आम्ही सत्तेचे भागीदार होण्यासाठी पडेल तो संघर्ष स्वीकारल्याशिवाय किंवा सत्तेसाठी पेटून उठल्याशिवाय आमच्या पुरुषार्थाला काडीचीही किंमत नाही. म्हणून जग जिंकण्याची ताकद आम्हाला साहेबांनी दिलेली आहे. तीच क्रांतीची मशाल आम्ही सत्तेच्या रुपाने पेटवल्या शिवाय शांत बसणार नाही.
आम्ही सामाजिक चळवळीत सतरा अठरा वर्षे झाले आक्रमकपणे अंगावर डझनभर गुन्हे असलेले आम्ही कार्यकर्ते. माझ्यासारखे लाखो कार्यकर्ते परत नव्याने हजारो लोक जोडण्यासाठी प्रामाणिकपणे काम करत राहू. आमचा वैचारिक विकास झाला, मात्र आमचा सामाजिक विकास आणि राजकीय विकास होण्यासाठी आमचीच लोक आम्हाला कधीच जवळ करत नाहीत. हे का घडतं...! कारण आम्ही भटारखाना म्हणून जन्माला आलो. कारण आम्ही माणसं गोळा करायची, घडवायची आणि ती तयार झाली ती दुसऱ्याच्या दावणीला बांधायची...! ही आमची ओळख आम्हीच केली असल्यामुळे आम्हाला कोणीही विचारायला तयार नाही. आणि समजा आम्ही काही हालचाल करायचा प्रयत्न केला, राजकीय विचारधारा सत्तेसाठी बदलायच्या म्हटलं तर ह्यांच्या बुडाखाली आग लागते. कारण यांची दुकानदारी बंद होते. समविचारी आम्हाला जवळ करायला तयार नाहीत. इतर लोक दखल घेत नाहीत, सांगा ना... एवढी वर्ष आम्ही काम करून जर आम्हाला राजकीय इच्छा शक्ती निर्माण झाली तर मग आमचं बिघडलं कुठं...!
महाराष्ट्राला संभाजी ब्रिगेड काय आहे हे वेगळं सांगायची गरज नाही. मात्र सगळ्या राजकीय पक्षांना विनंती की, संभाजी ब्रिगेड हे वैचारिक संघटन असून आग्यामोहोळ आहे. आमच्या आणि तुमच्या सगळ्या पक्षांच्या कार्यकर्त्यांच्या डोक्यात सुद्धा संभाजी ब्रिगेड वळवळ करते. मात्र ती माणसं सत्तेसाठी तुमच्या सोबत आहेत. एवढं काम संभाजी ब्रिगेडने नक्कीच केलेला आहे. RSS सोबत आमचा वैचारिक विरोध किंवा लढा हा मरणोत्तर आहे. ब्राह्मणी व्यवस्थेला कडाडून विरोध करणे हेच आमचं काम आहे. कारण आमची बळीवंशापासूनची परंपरागत व्यवस्था याच विकृत लोकांनी जाणिवपुर्वक आजपर्यंत बदनाम केली. आमचा त्याला कायम विरोधच असेल. मात्र आमच्या वैचारिक प्रगल्भतेवर कोणी शंका घेण्याचे काही कारण नाही.
संभाजी ब्रिगेड युती आघाडी करणार म्हटल्यानंतर बरेच जणांनी लेख, पोस्ट, बातम्या किंवा वेगवेगळ्या विरोधी कमेंट केल्या. भरपूर चर्चा केल्या. विरोध केला तरी स्वागत आहे. मात्र घरात बसून वैचारिक वांझोट्या गप्पा मारण्यापेक्षा क्रांतीच्या मशाली पेटवण्यासाठी कधीतरी पुढे येऊन लढायला शिका...! तरच तुम्हाला स्वातंत्र्याचे स्वप्न राजकीय पटलावर दिसायला सुरुवात होईल.
परिवर्तनाची चळवळ पुरोगामी विचारांशी जोडून बहुजनांना जागे करण्याचे काम 'संभाजी ब्रिगेड' आजपर्यंत करत आलेली आहे. इथून पुढे शंभर वर्ष संघटनात्मक पद्धतीने काम करत राहील आणि यासाठी तुम्ही सगळी जिवंत विचारांची जिवंत माणसं आमच्या व संभाजी ब्रिगेड च्या सोबत असाल हीच हीच अपेक्षा आहे.
चर्चा लढणाऱ्यांची होते... बघणार्यांची नाही, हेच लक्षात ठेवा आणि सोबत रहा...
जय जिजाऊ...! जय शिवराय...!!
*- संतोष शिंदे,*
प्रदेश संघटक, संभाजी ब्रिगेड, महाराष्ट्र
9850842703
0 Comments