मोहोळ पोलिस ठाण्याच्या कर्मचाऱ्यां विरोधात थेट पोलिस अधीक्षकांकडे तक्रार

पो.कॉ. चंद्रकांत कदम यांच्यावर कारवाई करामनसेचे शहराध्यक्ष शाहूराजे देशमुख यांनी केली कारवाईची मागणी

मोहोळ (कटूसत्य वृत्त):-कोरोना कालावधीत सामान्य नागरिक व व्यावसायिक अडचणीत आला आहे. मात्र मोहोळ पोलीस ठाण्यातील पोलीस हेडकॉन्स्टेबल चंद्रकांत कदम हे कोरोना संकटाच्या काळात लॉकडाउन चा गैरफायदा घेऊन तालुक्यातील छोटे दुकानदार, हॉटेल चालक तसेच अवैध धंदे करणारे वाळू, बेकायदा दारू विकणारे यांच्या कडून मोठ्या प्रमाणात पैसे जमा करीत आहे. अशा पोलीस हेड कॉन्स्टेबल च्या विरोधात पोलीस अधीक्षक तेजस्वि सातपुते यांनी लक्ष देऊन अन्याय दूर करावा, अशी मागणी एका निवेदनाद्वारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष शाहूराजे देशमुख यांनी केली आहे.महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुकाध्यक्ष कैलास खडके, जिल्हा उपाध्यक्ष हिंदुराव देशमुख, शहराध्यक्ष शाहूराजे देशमुख यांनी याबाबत सोलापूर येथे भेटून पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांना दि. ८ जुलै रोजी एक निवेदन दिले आहे.या निवेदनात म्हटले आहे की, मोहोळ तालुक्यातील ग्रामीण भागात कोरोना मुळे लॉकडाऊन लागू होते. मात्र त्याचा गैरफायदा घेऊन ग्रामीण भागात पोलीस हेडकॉन्स्टेबल चंद्रकांत कदम हे गेल्यावर छोटे छोटे दुकानदार, चहा चहाची टपरी, हॉटेल यांना कायद्याचा धाक दाखवून पैशाची मागणी करताना दिसत आहे. त्यामुळे वाळू, बेकायदा दारू विक्रेत्यांना सहकार्य करणाऱ्या पोलीस हेडकॉन्स्टेबलची पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी चौकशी करून अन्याय दूर करावा अन्यथा मनसे स्टाईलने आंदोलन करणार असल्याचा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष शाहूराजे देशमुख यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.गेल्या काही दिवसापूर्वी मनसेचे शहराध्यक्ष शाहूराज देशमुख यांनी मोहोळ पोलिस प्रशासनाकडे रितसर लेखी निवेदन देऊन पोलीस कर्मचारी चंद्रकांत कदम यांच्यावर कारवाईची मागणी केली होती. मात्र मोहोळ पोलिस प्रशासनाने काहीही कार्यवाही न केल्यामुळे या बाबतची कैफियत देशमुख यांनी थेट पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांना प्रत्यक्ष भेटून मांडली. त्यांनी पोलिस अधीक्षकांना प्रत्यक्ष भेटून लेखी निवेदन देऊन कदम यांच्यावर कारवाई करण्याची विनंती केली. मोहोळ पोलिस प्रशासनातील बऱ्याच कर्मचाऱ्यांच्या वसुलीच्या भानगडी दिवसेंदिवस चव्हाट्यावर येत आहेत. कोणी वाळूची वसुली वाटून घेतली तर कोणी जुगाराची, कोणाकडे दारूची तर कोणाकडे अन्य अवैध धंद्यांची. यामुळे मोहोळ पोलिस प्रशासनात प्रामाणिक काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांपेक्षा वसुली करणाऱ्या कर्मचाऱ्यांचाच तोरा वाढल्याचे स्पष्टपणे जाणवत आहे. मनसेचे देशमुख यांनी केलेल्या तक्रारीमुळे मोहोळ पोलिस प्रशासन आणि सामान्य जनता यांमधील वाद चव्हाट्यावर आला आहे.
0 Comments