गोरगरिबांच्या कामाला प्राधान्य द्या- पालकमंत्री दत्तात्रय भरणे
गणेशनगर येथे पाण्याच्या टाकीचे लोकार्पण
सोलापूर, (कटूसत्य वृत्त):- कोणतेही पद शोभेचे नाही. प्रत्येकाने गोरगरीब जनतेला केंद्रबिंदू माणून जनतेची कामे, अडचणी सोडविण्यावर भर द्यायला हवा. शासनाच्या पैशाचा वापर सामान्यांच्या विकासासाठी व्हावा, अशी अपेक्षा पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी व्यक्त केली.
अमृत योजनेंतर्गत मडकी वस्ती, गणेशनगर येथील नव्याने बांधण्यात आलेल्या पाण्याच्या टाकीचे लोकार्पण आणि जुना कारंबा नाका येथे पुलाचे लोकार्पण भरणे यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी महापालिकेचे विरोधी पक्षनेते अमोल शिंदे, नगरसेवक तथा गटनेते आनंद चंदनशिवे, चेतन नरोटे, किसन जाधव, गणेश पुजारी, ज्योतीताई बमगोंडे आदींसह परिसरातील नागरिक उपस्थित होते.
भरणे म्हणाले, गणेशनगर येथे अमृत योजनेअंतर्गत १२ लाख लिटर क्षमतेची पाण्याची टाकी बांधण्यात आली आहे. टाकीमुळे परिसरातील नागरिकांना पाण्याची सोय होणार आहे. महिलांची पाण्याची गरज पूर्ण झाल्याने त्या कधीच विसरत नाहीत. प्रत्येकाने पाण्याचा काटकसरीने वापर करावा. शहराला नियमितपणे पाणीपुरवठा होण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे, यामुळे नागरिकांनी कोरोनाचे नियम पाळावेत. मास्कचा वापर करा, गर्दीत जाणे टाळा, हात स्वच्छ धुण्याचे आवाहनही भरणे यांनी केले.
जुना कारंबा नाका पुलाचे लोकार्पण
जुना कारंबा नाका येथे मुलभूत सोयी-सुविधा योजनेंतर्गत पुलाचे लोकार्पण भरणे यांच्या हस्ते झाले.
या पुलामुळे शहरालगत असलेल्या पांढरे वस्ती, सन्मतीनगर आणि १४ गावांना जाण्याची सोय होणार आहे. पुलामुळे कारंबा नाका ते बार्शी टोलनाका तीन किमी अंतर कमी झाले आहे.
दलित वस्ती योजनेचा आणि रस्त्याचा प्रस्ताव सादर झाल्यास निधी उपलब्ध करून देण्याची ग्वाही भरणे यांनी यावेळी बोलताना दिली.
चंदनशिवे यांनी सांगितले की, पांढरेवस्ती, सन्मतीनगरला पावसाळ्यात नागरिकांना जाता येत नव्हते. भरणे यांच्यामुळे नागरिकांची सोय झाली आहे. पाण्याच्या टाकीमुळे गणेशनगर भागातील नागरिकांना दररोज पाणी देण्यासाठी कटिबद्ध आहे.
0 Comments