Hot Posts

6/recent/ticker-posts

तिसऱ्या लाटेसाठी सज्ज रहा : पालकमंत्री भरणे

                         तिसऱ्या लाटेसाठी सज्ज रहा : पालकमंत्री भरणे




            सोलापूर(कटूसत्य वृत्त):- कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा मुकाबला करण्यासाठी सर्व विभागांनी सज्ज राहावे, अशा सूचना पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज दिल्या.

            जिल्ह्यातील कोरोना स्थितीचा आढावा घेण्यासाठी भरणे यांनी आज बैठक घेतली. नियोजन भवन येथे झालेल्या या बैठकीस जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, महानगरपालिका आयुक्त पि. शिवशंकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, अतिरिक्त पोलीस अधीक्षक अतुल झेंडे उपस्थित होते.

            भरणे यांनी बैठकीच्या प्रारंभी शहर आणि ग्रामीण भागातील कोविड विषाणूने संसर्ग झालेल्या रुग्णांच्या स्थितीबाबत माहिती घेतली. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शीतलकुमार जाधव यांनी सादरीकरणाद्वारे माहिती दिली.

            भरणे यांनी सांगितले की,  काही वैद्यकिय अहवालानुसार तिसरी लाट येण्याची शक्यता आहे. युरोपातील काही देशात रुग्णसंख्या वाढत आहे. ही बाब लक्षात घेता जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद, सार्वजनिक आरोग्य विभाग, पोलीस विभाग यांनी तिसऱ्या लाटेचा मुकाबला करण्यासाठी सज्ज राहण्याची तयारी करावी.

            तिसऱ्या लाटेत बालकांना जास्त लागण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. बालकांची काळजी घेण्यासाठी सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेत आणि खासगी डॉक्टरांची मदत घेऊन यंत्रणा सज्ज ठेवावी. त्यासाठी आवश्यक असणारी औषधे, इंजेक्शन, आयसीयू यंत्रणा आदीबाबत आढावा घेऊन योग्य ती तयारी करावी. अशा सूचना भरणे यांनी दिल्या.

            जिल्ह्यातील माळशिरस आणि पंढरपूर तालुक्यात अद्याप कोरोनाचे रुग्ण आढळत आहेत, त्यामुळे या तालुक्यातील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी उपाययोजना कराव्यात, अशा सूचना भरणे यानी दिल्या.

माझे मुलं माझी जबाबदारी घडीपुस्तिकेचे प्रकाशन

तिसऱ्या लाटेचा धोका बालकांना असल्याचे वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. पालक आणि मुलांना जागृतीबाबत जिल्हा परिषदेच्या वतीने माझे मुलं माझी जबाबदारी आणि माझा विद्यार्थी माझी जबाबदारी ही घडीपुस्तिका तयार केली आहे. घडीपुस्तिकेचे प्रकाशन भरणे यांच्या हस्ते झाले.

या पुस्तिकेत मुलांची काय आणि कशी काळजी घ्यावी, ताप आला तर त्वरित दवाखान्यात जाऊन निदान करा. मास्क, लहान मुलांचा आहार, विलगीकरण, काय करावे आणि काय करू नये याविषयीची माहिती यात देण्यात आली आहे. कोरोनाची लक्षणं दिसताच नजीकच्या प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालयात संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

            यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शीतल जाधव, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदीप ढोले, वैशंपायन वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी संजय डोळे, अर्चना गायकवाड, उप मुख्य कार्यकारी अधिकारी चंचल पाटील, जावेद शेख, कार्यकारी अभियंता संभाजी धोत्रे आदी उपस्थित होते.


Reactions

Post a Comment

0 Comments