Hot Posts

6/recent/ticker-posts

भूजल साक्षरता अभियानात सर्वांनी सहभागी होण्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील यांचे आवाहन

भूजल साक्षरता अभियानात सर्वांनी सहभागी होण्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील यांचे आवाहन



मुंबई (कटूसत्य वृत्त):-
भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त भूजल साक्षरता अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानात सर्वांनी सहभागी होऊन, लोकसहभागातून विविध उपक्रम राबवून आपले गाव पाणीदार बनवावे असे आवाहन पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेने भूजल साक्षरतेविषयी, जनजागृतीसाठी तयार केलेल्या विविध साहित्याचे प्रकाशन मंत्रालयात पाणी पुरवठा व स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील व कृषिमंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.

भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त तयार करण्यात आलेल्या लोगोचे अनावरण तसेच छतावरील पाऊस पाणी संकलन, विहीर, कूपनलिका पुनर्भरणविषयक घडीपत्रिका तसेच शाहीर, पोवाडा व भारुड या माध्यमातून जनजागृती करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या ध्वनिचित्रफीतिचे प्रकाशनही यावेळी मंत्री पाटील व भुसे यांच्या हस्ते करण्यात आले.

भूजल साक्षरता अभियान : पाऊस पाणी संकलनाद्वारे भूजल पुनर्भरण, विहीर पुनर्भरण, विंधन विहीर /कूपनलिकेद्वारे  भूजल  पुनर्भरण या संकल्पनांवर आधारित भित्ती पत्रिकांचे प्रकाशनही यावेळी मंत्री गुलाबराव पाटील व दादाजी भुसे  हस्ते करण्यात आले.

राज्यात सध्या भूजल साक्षरता अभियान राबविण्यात येत आहे. त्या अनुषंगाने आतापर्यंत ५ हजार लोकांना प्रशिक्षण देण्यात आलेले असून सुमारे १ लाख लोकांना प्रशिक्षण देण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे अशी माहिती, भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेचे संचालक मल्लिनाथ कलशेट्टी यांनी यावेळी प्रास्ताविकात दिली.

यावेळी पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ.संजय चहांदे तसेच कृषी, मृद व जलसंधारण विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

Reactions

Post a Comment

0 Comments