पंढरपुरात प्रशासन करणार कोरोना बाधितांचा पाठपुरावा



कोरोना बाधितांच्या गावांवर प्रशासनाचे लक्ष, कडक अंमलबजावणी, चाचण्यावर भर, एकाही रुग्णांला घरी नाही ठेवणार
पंढरपूर, (कटूसत्य वृत्त) : पंढरपूर तालुक्यातील ग्रामीण भागात कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. वाढत्या रुग्णसंख्येला आळा घालण्यासाठी महसूल, आरोग्य व पोलीस प्रशासनाच्या वतीने नियोजन करण्यात आले आहे. गांव निहाय कोरोना बाधित रुग्णांची यादी तयार करुन कोणताही रुग्ण घरी राहणार नाही याची दक्षता घेवून त्यास संस्थात्मक विलकिरण करण्यात येत आहे. जादा रुग्ण संख्या असलेल्या गावांत जास्तीत कोरोना चाचणीवर भर देवून रुग्णांची संख्या शुन्यावर आणण्यासाठी प्रशासनाने कडक उपाययोजना केल्या असल्याचे प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी सांगितले.
पंढरपूर तालुक्यातील मार्च महिन्यापासून कोरोना बाधित रुणांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. वाढती रुग्ण संख्या लक्षात घेता तालुका प्रशासनाने कडक अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली. यामध्ये तालुक्यातील ज्या गावांता कोरोना बाधित रुग्णांची संख्या जास्त आहे. त्या गावांची यादी तयार करण्यात आली. त्या गावांतील सर्व नागरिकांची कोरोना चाचणी करण्यात येणार आहे. यामध्ये जे नागरिक बाधित आढळतील त्यांना तात्काळ संस्थात्मक विलकिरणात ठेवून उपचार करण्यात येणार आहेत. काही रुग्ण घरातच थांबत असल्याने संपूर्ण कुटूंब बाधित होण्याची शक्यता आहे. यासाठी नागरिकांनी सूचनांचे पालन करुन प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहनही श्री.ढोले यांनी केले आहे.
तालुक्यात कोरोनाची साखळी तोडण्यासाठी पोलीस प्रशसानाकडून कडक अंमलबजावणी करण्यात येत आहे. ज्या गावांत कोरोना बाधित रुग्णांची संख्या जास्त आहे त्या गावात पोलीस प्रशासनाच्या वतीने दिवस- रात्र गस्त सुरु करण्यात आला असून, विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांची कोरोना चाचणी तसेच दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. जे नागरिक उपाचाराविना घरीच थांबले आहेत यांची माहिती घेवून त्यांना तात्काळ रुग्णवाहिकेतून उपचारासाठी पाठविण्यात येत असल्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांनी सांगितले.
तालुक्यातील प्रत्येक गावांमध्ये ग्रामस्तरीय समितीची बैठक घेवून कोणताही कोरोना बाधित रुग्ण गृह अलगिकरणात राहणार याची दक्षता घेण्यात आली आहे. यासाठी प्रत्येक गावांत कोविड केअर सेंटर सुरु करण्यात आले आहे. जे रुग्ण घरीच उपचार घेत आहेत यांची आरोग्य पथकामार्फत माहिती घेवून त्यांना तात्काळ उपचारासाठी कोविड केअर सेंटर मध्ये ठेवण्यात येत आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे नागरिकांनी पालन करावे असे, आवाहन तहसिलदार सुशिल बेल्हेकर यांनी केले आहे.
0 Comments