मोहोळ येथील डेडीकेटेड कोविड हॉस्पिटलमध्ये रुग्णांना चांगल्या दर्जाची सेवा देण्याची माजी भाजप तालुकाध्यक्ष दशरथ काळे यांची मागणी
मोहोळ (कटूसत्य वृत्त): मोहोळ तालुक्यातील कोविड रुग्णालये व डेडिकेटेड कोविड सेंटरमधे रामभरोसे सुरू असलेला कारभार बंद करून कोविड रुग्णांना योग्य उपचार व सुविधा देण्यात याव्यात अन्यथा आंदोलनाचा मार्ग अवलंबावा लागेल असा इशारा भाजपाचे माजी तालुका अध्यक्ष दशरथ काळे यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.
काळे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की मोहोळ तालुक्यात चार कोविड केअर सेंटर असून एक १०० बेडचे डेडिकेटेड कोविड सेंटर आहे परंतु याठिकाणी रुग्णांना देण्यात येत असलेला औषध पुरवठा खूपच कमी असून रुग्णांना इतरत्र हलवण्यासाठी कार्डियाक ॲम्बुलन्स व ऑक्सिजन ॲम्बुलन्सची आवश्यकता असते त्याही उपलब्ध नाहीत. त्यासाठी शासनाच्या १०८ नंबर ॲम्बुलन्सवर अवलंबून रहावे लागते. परंतु ती ॲम्बुलन्स वेळेवर येत नाही. या रुग्णांवर उपचार करण्यासाठी एच आर सी टी व ब्लड टेस्ट करणे आवश्यक असते, परंतु मोहोळ तालुक्यात याची व्यवस्था नाही. त्यामुळे कोवीड रुग्णावर उपचार करण्याचा फार्स येथील डॉक्टर कशाच्या आधारे करत आहेत? असा प्रश्न ही काळे यांनी उपस्थित केला आहे.
रुग्णांवर योग्य प्रकारे उपचार करावेत तसेच तातडीने रुग्णाला इतरत्र हलविण्यासाठी कार्डियाक ॲम्बुलन्स व ऑक्सिजन ॲम्बुलन्सची व्यवस्था करावी, एस आर सिटी टेस्ट व ब्लड टेस्ट करणाऱ्या मशीन तात्काळ उपलब्ध कराव्यात, मोहोळ येथे रुग्णांची संख्या पाहता डेडिकेटेड सेंटर मध्ये ५० तर ग्रामीण रुग्णालयात १० ऑक्सिजन बेड व दोन्ही ठिकाणी दोन दोन व्हेंटिलेटर बेड तसेच रुग्णांना दैनंदिन वापराच्या वस्तू देण्यात याव्यात व वापर झाल्यानंतर त्या डिस्पोजल कराव्यात. रुग्णांची हेळसांड थांबवून त्यांना योग्य उपचार व सुविधा देण्यात याव्यात अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा भारतीय जनता पार्टीचे माजी तालुकाध्यक्ष दशरथ काळे यांनी दिला आहे.
0 Comments