आपुलकी प्रतिष्ठानच्यावतीने गरीब व होतकरू इंजिनिअरिंग विद्यार्थ्यास लॅपटॉपची भेट
सांगोला (कटूसत्य वृत्त):- आपुलकी प्रतिष्ठान सांगोला यांच्यावतीने जवळा ता. सांगोला येथील रहिवाशी परंतु वडिलांच्या निधनानंतर सोलापूरला स्थायिक झालेल्या रणजितसिंह जाधव या गरीब व होतकरू विद्यार्थ्यास त्याच्या इंजिनिअरिंग शिक्षणासाठी लॅपटॉप भेट देण्यात आला.
रणजितसिंह भारत जाधव हा विद्यार्थी पुण्याच्या व्हीआयआयटी इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये शिक्षण घेत आहे. परंतु सध्या कॉलेज ऑनलाइन असल्यामुळे त्याला लॅपटॉपची गरज होती. परिस्थिती जेमतेम असल्याने तो लॅपटॉप घेऊ शकत नसल्याने त्याने सांगोला येथे सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या "आपुलकी प्रतिष्ठान, सांगोला" या संस्थेकडे संपर्क साधून सेकंडहँड लॅपटॉप देण्याची विनंती केली. आपुलकी प्रतिष्ठानच्या व्हाट्सएप ग्रुपमध्ये यासंदर्भात पोस्ट टाकल्यानंतर आपुलकीच्या सदस्यांनी नेहमीप्रमाणे मनाचा मोठेपणा दाखवत देणगीदाखल रक्कम जमा करण्यास सुरुवात केली. मदतीची ही पोस्ट इतरही दोन-तीन व्हाट्सएप ग्रुपवर फिरल्यामुळे त्या त्या ग्रुपमधील काही दानशूर व्यक्तींनीही देणगी देऊन मनाचे औदार्य दाखवले आणि बघता बघता तीन दिवसातच 52 देणगीदारांकडून 38 हजार 950 रुपये जमा झाले. सोशल मीडियाचा वापर अशा एका योग्य कामासाठी झालेला पाहून अनेकांनी समाधान व्यक्त केले. जिथे सेकंडहँड लॅपटॉप ची मागणी झाली होती, तिथे त्याच्या नशिबाने नवीन लॅपटॉप त्याला मिळणार होता. त्यामुळे जाधव याच्या कुटुंबियांसह देणगीदारांनाही मोठा आनंद झाला.
बुधवारी सकाळी आपुलकीचे ज्येष्ठ सदस्य तथा माजी नगराध्यक्ष डॉ. प्रभाकर माळी, सुभाष लऊळकर , दीपक चोथे यांच्या हस्ते रणजितसिंह जाधव व त्याची आई सुशिला जाधव यांना लॅपटॉप सुपूर्द करण्यात आला. यावेळी आपुलकीचे सदस्य शरणप्पा हळ्ळीसागर,अच्युत फुले, नाना हालंगडे, अतुल वाघमोडे, जितेंद्र बोत्रे, अरुण जगताप गुरुजी, रमेशअण्णा देशपांडे यांच्यासह देणगीदार राष्ट्रवादी काँग्रेसचे सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष अशोक करताडे, माजी नगरसेवक अरुण काळे आदी उपस्थित होते.
0 Comments