शेटफळच्या जिल्हा रुग्णालयात कोवीड टेस्टिंग आणि लसीकरण आणि कोवीड सुवीधा सुरू करा - बाळराजे पाटील
मोहोळ (साहील शेख): मोहोळ तालुक्यातील शेटफळ येथील जिल्हा रुग्णालयामध्ये गेल्या वर्षभरापासून ना करोनाच्या टेस्ट घेतल्या जात आहेत, ना कधी कोवीड प्रतिबंधक लस देण्याची सोय केली आहे. त्यामुळे सध्या शेटफळ पंचक्रोशीतील रुग्णांना प्रचंड हेळसांड सहन करावी लागत आहे . या जिल्हा रुग्णालयात कोवीड विषयक सुविधा नसल्याने नागरिकांना अन्य तालुक्यातील खाजगी दवाखान्याकडे नाइलाजाने या सेवांसाठी जावे लागत आहे. त्यामुळे हे शेटफळचे हे जिल्हा रुग्णालय केवळ असून अडचण आणि नसून खोळंबा अशा अवस्थेत आहे. त्यामुळे जिल्हा रुग्णालयात त्वरित कोवीडचे लसीकरण आणि कोवीडच्या टेस्टची सोय त्याचबरोबर प्रशस्त इमारत असल्यामुळे अद्यावत कोवीड सेंटर सुरू करण्याची मागणी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष तथा लोकनेते कारखान्याचे चेअरमन जि प सदस्य बाळराजे पाटील यांनी माध्यमांशी बोलताना केली.
या महत्त्वाच्या मुद्द्याबाबत बोलताना बाळराजे पाटील म्हणाले की गेल्या वर्षभरापासून मोहोळ तालुक्यातील आरोग्यव्यवस्था करोना महामारीशी मोठ्या निकराने झुंज देत आहे. मोहोळ तालुक्यातील अन्य आरोग्य केंद्रांमध्ये कोवीडच्या टेस्टिंग त्याचबरोबर कोवीडचे लसीकरण राबवताना दिसत आहेत. मात्र शेटफळच्या जिल्हा रुग्णालयात आजपावेतो तसा कोणताही कोवीडशी संदर्भात आरोग्यविषयक उपक्रम राबवला जात नाही.
हे तालुक्याच्या या भागातील कोवीड रुग्णांचे दुर्दैवच म्हणावे लागेल अशी खंत यावेळी बाळराजे पाटील यांनी व्यक्त केली. या परिसरातील अनेक नागरिकांना इतके चांगल्या दर्जाचे उपजिल्हा रुग्णालय असून देखील खाजगी दवाखान्यावर अवलंबून राहावे लागत आहे. याबाबतची कैफियत या परिसरातील अनेक नागरिकांनी मला भ्रमणध्वनीद्वारे सांगितले आहे असेही यावेळी ते म्हणाले.
0 Comments