रेमडेसिव्हिरचा पुरवठा थेट कोविड रुग्णालयांना करा - चेतनसिंह केदार-सावंत

सांगोला (कटूसत्य वृत्त): गेल्या काही दिवसांपासून सांगोला तालुक्यात रेमडेसिव्हिर इंजेक्शनचा तुटवडा जाणवत असल्याने रुग्णांच्या नातेवाइकांची दमछाक सुरू होत आहे. रेमडेसिविर इंजेक्शनसाठी कोरोना रुग्णांच्या नातेवाईकांची धावपळ होऊ नये तसेच काळाबाजार रोखण्याच्या अनुषंगाने अत्यावस्थ कोरोना बाधितांवर उपचार सुरू असलेल्या कोविड रुग्णालयांना रेमडेसिविर इंजेक्शनचा थेट पुरवठा करण्याची मागणी भाजप तालुकाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांनी केली आहे.
कोरोना बाधित रुग्णास रेमडेसिव्हिर इंजेक्शन देणे गरजेचे असल्यास नेमके किती इंजेक्शन देण्याची गरज आहे, याबाबत खात्री न करता सरसकट सहा ते सात इंजेक्शन आणण्याची मागणी होत आहे. यामुळे रुग्णांचे नातेवाईक इंजेक्शन खरेदीसाठी मेडिकल, होलसेल दुकानांमध्ये गर्दी करत असून, भीतीचे वातावरण निर्माण होत आहे. तसेच रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार मोठ्या प्रमाणात होत असून 12 ते 15 हजार रुपये देऊन इंजेक्शन घेण्याची वेळ आली आहे.
त्यानुषंगाने रेमडेसिव्हिर इंजेक्शन थेट कोविड रुग्णालयात उपलब्ध करून द्यावेत. जेणेकरून मूळ किमतीत व वेळेवर इंजेक्शन उपलब्ध होण्यास मदत होईल. तसेच तक्रारींच्या निराकरणासाठी भरारी पथक नियुक्त करावे. कोविड रुग्णालयांमध्ये औषधाचा अनियंत्रित वापर, अनाधिकृत साठा आणि गैरवापर होण्याचे निदर्शनास आल्यास तातडीने कारवाई करण्याबाबत भरारी पथकामार्फत करावाई करावी. यामुळे अनधिकृतपणे इंजेक्शनचा साठा करणाऱ्यावर वचक निर्माण होईल. कोरोना बाधितांच्या नातेवाईकांना इंजेक्शनसाठी धावपळ होऊ नये, वेळेवर व मूळ किमतीत रेमडेसिविर इंजेक्शन उपलब्ध होण्यासाठी प्रशासनाने पुढाकार घेऊन कोविड रुग्णालयातच इंजेक्शन उपलब्ध करून देण्याची मागणी भाजप तालुकाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांनी केली आहे.
0 Comments