सांगोला नगरपरिषदेचे 'गृहभेटीतुन कोरोना जनजागृती' अभियान
सांगोला (कटूसत्य वृत्त):- राज्यात कोरोनाची दुसरी लाट आलेली असून सोलापूर जिल्हा रुग्ण संख्येत यावेळीही अग्रेसर असल्याचे चित्र आहे. सांगोला शहरात देखील रुग्णसंख्या वाढताना दिसत असून नागरिकांमध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटे बाबत जनजागृती व्हावी जेणेकरून सर्वांकडून कोरोना नियमावली चे पालन होऊन शहरातील कोरोना परिस्थिती नियंत्रणात यावी या उद्देशाने सांगोला नगरपरिषदेकडून शहरात घरोघरी भेटी देऊन जनजागृती अभियानाची सुरुवात केल्याची माहिती मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांनी दिली.
शहरात सध्या 104 ऍक्टिव्ह रुग्ण असून दुसऱ्या लाटेत एका व्यक्तीचा कोरोना मुळे मृत्यू झाला आहे. एका बाजूला रुग्ण संख्या वाढत असताना नागरिकांमध्ये मात्र पहिल्या लाटेत पहायला मिळणारी जबाबदारी ची जाणीव कुठेतरी कमी झालीय असे शहरात चित्र आहे. कोरोना प्रसारास आळा बसावा याकरिता राज्य शासनाने कडक निर्बंध लावले आहेत त्यामुळे शहरातील अनेक दुकाने,आस्थापना बंद आहेत. तरीदेखील अनेक नागरिक मात्र विनाकारण घराबाहेर पडून गर्दी करत असल्याचे पहायला मिळत आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतील विषाणू स्ट्रेन हा जास्त घातक व संसर्गजन्य असून लहान मुलांची देखील काळजी घेणे गरजेचे आहे. कोरोना ची लागण होऊ नये व झाली तरीही त्यावर मात करण्यासाठी सर्वात प्रभावी अस्त्र म्हणजे आपली 'प्रतिकारशक्ती'. त्यामुळे कोरोनाचे नियम पाळण्याबरोबरच शरीराची प्रतिकारशक्ती वाढविणारा सकस आहार घेणे देखील तितकेच महत्वाचे आहे.
सध्या कोरोनावर लस देखील उपलब्ध झाली आहे. लसीचे दोन्ही डोस घेतल्या नंतर देखील कदाचित कोरोना होईलही परंतु त्याची दाहकता निश्चित पणे कमी असेल. त्यामुळे लसीबाबत कुठेही गैरसमज न बाळगता लसीकरण करून स्वतःला सुरक्षित करून घेणे गरजेचे आहे.
कोरोना सदृश्य लक्षणे दिसत असूनही अनेकजण डॉक्टरांशी संपर्क करून कोरोना चाचणी न करता आपला आजार लपवून अंगावर काढतात. अश्याने अनेकवेळा उशीर झाल्याने नुकसान होत व आजार लवकर बरा होत नाही. उशिरा निदान,उपचार सुरू झाल्याने कोमॉरबीड वयस्कर नागरिकांमध्ये मृत्यू चे प्रमाण देखील वाढते.
या सर्व गोष्टींची सांगोला शहरातील नागरिकांना माहीत व्हावी यासाठी 10 प्रभागात 10 पथके तयार करून त्यांच्या मार्फत घरोघरी भेटी देऊन नागरिकांना कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत कोरोना नियमावली चे पालन करणे, हिरव्या पालेभाज्या,व्हिटॅमिन सी चा समावेश असणारी फळे,मटण,अंडी,कडधान्ये इत्यादी प्रतिकारशक्ती वाढविणारा आहाराचे सेवन, लसीकरण करून घेणे, लक्षणे दिसू लागतात कोरोना चाचणी करून घेणे या सर्व गोष्टी बाबत माहिती देणारे कोरोना जन जागृती अभियान सांगोला नगरपरिषदेमार्फत सुरू करण्यात आले आहे.
नियमावलीचे पालन न करणाऱ्यांवर कारवाई करण्या बरोबरच नागरिकांमध्ये लसीकरण,कोरोना चाचणी,प्रतिकारशक्ती वाढविणाऱ्या आहाराचे सेवन या गोष्टींची देखील जाणीव होणे तितकेच गरजेचे असल्याने नगरपरिषदेमार्फत हे "गृहभेटीतुन कोरोना जनजागृती" अभियान सुरू करण्यात आले आहे.
*कैलास केंद्रे,मुख्याधिकारी, सांगोला नगरपरिषद*
0 Comments