Hot Posts

6/recent/ticker-posts

राज्यातील सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायती व सरपंच प्रकाशात आणणार:जयंत पाटील

 राज्यातील सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायती व सरपंच प्रकाशात आणणार:जयंत पाटील

अखिल भारतीय सरपंच परिषदेचा अभिनव उपक्रम , दैनिक कटुसत्यशी साधला संवाद



कुर्डुवाडी  ( कटुसत्य वृत्त ) :- पंचायत राज विकास मंच संचलित अखिल भारतीय सरपंच परिषद 2003 पासून सातत्याने गावगाडा चालवणाऱ्या सरपंच व सहकाऱ्यांसाठी काम करत आहे. शासन दरबारी अनेक वर्षे पाठपुरावा करून करून ग्रामपंचायतीच्या आर्थिक व्यवहारासाठी चेकवर ग्रामसेवकांच्या बरोबरीने सरपंचाला सहीचा अधिकार मिळवून दिला. सरपंच उपसरपंच यांना मानधन मिळवून देत प्रशासनाकडून ग्रामपंचायतीची होणारी अडवणूक कमी व्हावी म्हणून प्रयत्न करत आहे.

               ग्रामपंचायत चालवणे तसे अत्यंत जिकरीचे काम आहे कारण फक्त ग्रामपंचायतीची कामे नव्हे तर इतर सर्व क्षेत्रातील कामे गावकरी सरपंचाकडे घेऊन येत असतात त्यामुळे सरपंच व सहकाऱ्यांना रात्रंदिवस राबावे लागते.अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा ग्रामपंचायती आर्थिक दृष्ट्या सक्षम नसताना विकास योजना मिळवण्यासाठी करावे लागणारे अथक प्रयत्न अशा अनेक संकटावर मात करत अनेक होतकरू कल्पक सरपंचांनी आपल्या ग्रामपंचायतीचा व गावांचा चेहरामोहराच बदलला आहे.

             राज्यामध्ये राळेगणसिद्धी,हिवरे बाजार,पाटोदा या गावाचा आदर्श घेऊन शेकडो गाव बघण्यासारखी झाली आहेत. परंतु या गावांना ग्रामपंचायतींना व त्यांना घडवणाऱ्या सरपंचांना राज्यात आजपर्यंत कोणीच फारसं प्रकाशात आणण्याचा प्रयत्न केलेला नाही म्हणून अखिल भारतीय सरपंच परिषद अशा सर्व कर्तुत्ववान सरपंच,ग्रामसेवक ,आगळ्यावेगळ्या ग्रामपंचायती व गावं राज्यातील जनतेसमोर आणणार आहे. तसेच त्यांचा राज्यस्तरीय पुरस्कार देऊन गुणगौरव सोहळा करणार आहे.ज्यामुळे राज्यात काम करत असलेल्या इतर सरपंचांना यापासून प्रेरणा मिळेल.असे मत अखिल भारतीय सरपंच परिषदेचे अध्यक्ष जयंत पाटील यांनी दैनिक कटुसत्यशी बोलताना सांगितले. यापुढे बोलताना पाटील म्हणाले की महाराष्ट्रात नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकांमध्ये उच्चशिक्षित नवयुवक मोठ्या संख्येने निवडून येऊन सरपंच झालेले आहेत. त्यांच्यासाठी हा कार्यक्रम दिशादर्शक असणार आहे. त्यामुळे राज्यातील विविध भागात विविध ग्रामपंचायतीत केलेले विविध प्रयोग सर्वांसमोर येतील त्यांचा आदर्श घेतला जाईल व अनुकरण करण्याचा प्रयत्न केला जाईल.आपले गाव असेच सर्वोत्कृष्ट घडवण्याचा प्रयत्न केला जाईल.

               या प्रकाशात आलेल्या सरपंचांची सुसंवाद साधून त्यातली काही गावे प्रत्यक्ष पाहणी करून अनेक सरपंच आपली ही गावं महाराष्ट्राच्या नकाशावर आणण्यासाठी सरसावतील हा प्रमुख उद्देश या अभियानात आहे. ही एक स्पर्धा नसून सर्वोत्कृष्ट सरपंच ग्रामसेवक ग्रामपंचायती निवड अभियान आहे. आगळ्यावेगळ्या ग्रामपंचायती शोध मोहीम आहे.कारण राज्यामध्ये काही कर्तुत्ववान सरपंचाने आपल्या ग्रामपंचायतीच्‍या नावे जमिनी खरेदी केली आहेत, तर काहीजण गायरानातून मोठे उत्पन्न मिळवत आहेत,अनेकांनी ग्रामपंचायतीचे उत्पन्न वाढीसाठी अनेक प्रयोग राबवले आहेत, तर काही सरपंचांनी करवसुलीसाठी भन्नाट कल्पना राबवल्या आहेत. काही कल्पक सरपंचांनी मच्छर मुक्त गाव,एक व्यक्ती एक झाड, लेकीचे झाड, हागणदारी मुक्त गाव,लेकीचा जन्म साजरा करणं, सुंदर स्मशानभूमी, नाना नानी पार्क, बालोद्यान, जिम, उत्तम व्यायाम शाळा, सर्वोत्तम तालीम,हाथ धुण्यास बेसिन, ISO ग्रामपंचायती व शाळा यासारख्या योजनांची अंमलबजावणी केली आहे.   महाराष्ट्रात कित्येक गाव अशी आहेत की ज्या गावात ग्रामपंचायत स्थापनेपासून आज पर्यंत बिनविरोध निवडणुकीची परंपरा आहे.तसेच कित्येक जण सातत्याने पंचवीस तीस पस्तीस वर्ष ग्रामपंचायत मध्ये काम करत आहेत निवडून येत आहेत. कित्येक गावात रोजगार निर्मितीसाठी शेतीला जोड धंदा म्हणून दूध व्यवसाय, फळबाग लागवड,नर्सरी, ट्रॅक्टर व शेती अवजारे व्यवसाय करून गावच्या उलाढालीत लाखोची भर घातली जात आहे.काही गावांनी ग्रामपंचायतीच्या इमारती कोट्यवधी रुपयांच्या बांधल्या असून अत्याधुनिक सोयीसुविधांनी परिपूर्ण आहेत.कित्येक सरपंचानी रक्तदान एक संकल्प,सुशोभित स्मशानभूमी,गावातील पाणी गावातच जिरवा अशा कल्पना राबवल्या आहेत.काही सरपंचांनी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांना प्रचंड महत्त्व देत अलौकिक अशा शाळा आणि विद्यार्थी घडवले आहेत.ज्यामुळे शासकीय अधिकाऱ्यांचं गाव अशी त्या गावची ओळख निर्माण झाली आहे. काही जिल्हा परिषद मध्ये शाळांमध्ये प्रवेश घेण्यासाठी रांगेत उभे राहावे लागते अशी उदाहरणे या राज्यात आहेत. ज्या गावात कायमच पाणी टंचाई असायची प्यायला सुद्धा पाणी नसायचे अशा ठिकाणी सरपंचांनी गावकऱ्यांच्या मदतीने जलसंधारणाची कोट्यावधीची कामे लोकसहभागातून पार पाडून आपली गावे संपूर्ण बागायती केली आहे.अशा कर्तुत्ववान सरपंचाची कहाणी- महती कोणीतरी सांगितली पाहिजे, प्रकाशात आणली पाहिजे ज्यामुळे उर्वरित ग्रामीण महाराष्ट्र पुढे जाण्यासाठी मोठा आदर्श निर्माण होइल.

               अखिल भारतीय सरपंच परिषदेची सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायत, सरपंच व ग्रामसेवक शोध व निवड अभियान ग्रामीण महाराष्ट्रासाठी फार मोठी दिशा देणारे ठरणार आहे. ही योजना शासनासाठी सुद्धा एक पथदर्शक प्रकल्प म्हणून सिद्ध होईल.अनेक चांगली गाव तेथील ऐतिहासिक ठिकाणं, नैसर्गिक सोयीसुविधा,झरे,धबधबे यासह अनेक बाबी प्रकाशित आल्यामुळे महाराष्ट्रातील पर्यटनामध्ये सुद्धा मोठी वाढ होईल. ही योजना म्हणजे आमच्यासाठी ग्रामीण महाराष्ट्राचा खजिना राज्यासमोर, देशासमोर आणि जगासमोर आणण्याचा सर्वांगसुंदर प्रयत्न ठरणार आहे. या योजनेमध्ये विकसित ग्रामपंचायत या कॅटेगरी मध्ये महाराष्ट्रातील सर्वोत्तम १०० ग्रामपंचायती निवडणार आहोत.  तसेच स्वतः सक्षम पणे काम करून गावाला पुढे नेण्याचा प्रयत्न करणाऱ्या 100 महिला सरपंचांची निवडदेखील करण्यात येणार आहे. याशिवाय हरित ग्राम,आरोग्य ग्राम खेलो इंडिया ग्राम, स्वच्छ ग्राम,आदर्श जिल्हा परिषद शाळा,जलयुक्त ग्राम,अद्ययावत ग्रामपंचायत इमारत, सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायत प्रशासक,कृषी सधन ग्राम,कल्पक सरपंच,आत्मनिर्भर ग्राम,कोरोना मुक्त ग्राम,तंटामुक्त ग्राम,पर्यटनशील ग्राम,विकसित आदिवासी ग्राम,स्वच्छजल ग्राम,उत्कृष्ट वीजव्यवस्था ग्राम,शिक्षित ग्राम अशा विविध कॅटेगरी मधून सरपंच व ग्रामपंचायतीच्या निवडी होणार आहेत.  याशिवाय आगळावेगळा उपक्रम व कार्य करणारे सरपंच आणि गाव यांना उत्तेजनार्थ पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. यासाठी विविध क्षेत्रात काम असलेल्या सरपंच व ग्रामपंचायतींनी या अभिनव उपक्रमात नक्की भाग घ्यावा आपल्या उत्कृष्ट कार्याची दखल महाराष्ट्र नक्की घेईल याची खात्री आहे.त्यामुळे जास्तीत जास्त गावांनी आपलं आगळेवेगळे कार्य जगाला माहिती करण्यासाठी मोठ्या संख्येने या शोधमोहीम निवड योजनेत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात येत आहे यासाठीचे निकष व फॉर्म सोशल मीडियावर लवकरच प्रसिद्ध केले जाईल.

Reactions

Post a Comment

0 Comments