दस्त नोंदणीसाठी गर्दी न करण्याचे आवाहन
पुणे (कटूसत्य वृत्त) :- स्थावर मिळकतीबाबतच्या अभिहस्तांतरणपत्र किंवा विक्रीपत्राच्या दस्त ऐवजावर शासनाने 31 मार्च 2021 पर्यत सूट जाहिर केली असल्याने या संधीचा लाभ घेण्याकरीता पुणे ग्रामीण जिल्ह्यातील 21 दुय्यम निबंधक कार्यालयात गर्दी होण्याची शक्यता आहे. तथापि मुद्रांक शुल्क भरलेले उक्त दस्तऐवज नोंदणी अधिनियमानुसार दस्त निष्पादीत केलेल्या दिनांकापासून चार महिन्यांच्या आत नोंदणी साठी सादर करता येतात. त्यामुळे दुय्यम निबंधक कार्यालयात गर्दी करु नये, असे आवाहन सह जिल्हा निबंधक वर्ग-1 तथा मुद्रांक जिल्हाधिकारी दि.पं. पाटील यांनी केले आहे.
कोणत्याही स्थावर मिळकतीबाबतच्या अभिहस्तांतरणपत्र किंवा विक्रीपत्राच्या, तसेच 29 वर्षापेक्षा जास्त कालावधीचे भाडेपट्टा या दस्तऐवजांवर अधिभारासह आकारणी योग्य असलेले मुद्रांक शुल्क 1 सप्टेंबर 2020 पासून सुरू होणा-या आणि दिनांक 31 डिसेंबर 2020 रोजी संपणा-या कालावधीकरीता तीन टक्के तर दि. 1 जानेवारी 2021 पासून सुरू होणा-या 31 मार्च 2021 रोजी संपणा-या कालावधीकरीता दोन टक्केने कमी केले आहेत. शासनाने दिलेल्या मुद्रांक शुल्काची सवलत 31 मार्च 2021 अखेर पर्यंत असल्याने या संधीचा लाभ घेण्याकरीता पुणे ग्रामीण जिल्ह्यातील एकूण 21 दुय्यम निंबधक कार्यालयात उक्त सवलत संपत असल्याने गर्दी होण्याची शक्यता आहे. माहे-मार्च 2021 पर्यंत मुद्रांक शुल्क सवलतीचा उपरोक्त प्रमाणे लाभ घेण्याच्या दृष्टिकोनातून निष्पादित करुन मुद्रांक शुल्क भरलेले दस्तऐवज नोंदणी अधिनियम 1908 चे कलम 23 नुसार दस्त निष्पादित केलेल्या दिनांकापासून चार महिन्यांच्या आत नोंदणीसाठी सादर करता येते.
सबब कोव्हिड -19 चा प्रादुर्भाव लक्षात घेता दुय्यम निबंधक कार्यालयात मार्च अखेरीस गर्दी न करता उपरोक्त प्रमाणे नोंदणी कायद्यायातील तरतुदीचा लाभ घ्यावा. तसेच कोव्हीड -19 च्या अनुंषगाने शासनाने वेळोवेळी दिलेल्या निर्देशानुसार सुरक्षात्मक उपाययोजनांचे कार्यालयात पालन करावे, असे आवाहन मुद्रांक जिल्हाधिकारी दि.पं.पाटील यांनी केले आहे.
0 Comments