राष्ट्रवादीची उमेदवारी नेमकी कोणत्या चवरेंना ?
सचिन कि रामदास कि आणखी कोणाला ?माने आणि चवरे या आडनावाभोवतीच फिरत आलेय पेनुरचे राजकारण
पेनुर (कटूसत्य वृत्त ) :- पेनुर जिल्हा परिषद गट व सातत्याने मोहोळ तालुक्याच्या राजकारणात धक्कातंत्राचा राजकारणाचा गट म्हणून ओळखला जातो. मोहोळ तालुक्यातील दहा मोठ्या गावांपैकी एक असलेल्या पेनुर मध्ये विविध पक्षांच्या पदक प्रमुखांची मोठी गर्दी आहे. आत्तापर्यंत या गावाने अनेक मोठमोठ्या पक्षांची मोठमोठी पदे भूषवली आहेत. आता गेल्या काही महिन्यापासून या गावात ग्रामपंचायत निवडणुकीचे वारे मोठ्या वेगाने वाहत होते. तर आता ग्रामपंचायतीच्या सत्ता स्थापनेनंतर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दोन गटात आजवर पेनुरचे राजकारण विभागले जायचे. नंतर भीमा लोकशक्ती परिवाराच्या स्थापनेनंतर गावात चवरे आणि माने यांच्यामध्येच राजकारणाची विभागणी होऊन चवरे आणि माने यांचे प्रत्येक पक्षात दोन गट निर्माण झाले.
पार पडलेल्या निवडणुकीत सरपंच पदाचे प्रबळ दावेदार असलेले रामदास चवरे हे ज्या प्रभाग क्रमांक चार मधून निवडून आले तो प्रभाग राष्ट्रवादीचे पेनुरचे ज्येष्ठ नेते हरिश्चंद्र चवरे यांचा प्रभाग म्हणून ओळखला जातो. हरिश्चंद्र चवरे यांचे सुपुत्र सचिन चवरे हे सध्या राष्ट्रवादीमध्ये बाळराजे पाटील यांचे निकटवर्तीय समर्थक म्हणून ओळखले जातात. सत्ता असो अथवा नसो नेहमी अनगरकरां समवेत राहण्याची भूमिका चवरे परिवाराने घेतली आहे. गत दोन ग्रामपंचायत निवडणुकीला पक्षश्रेष्ठींच्या शब्दाखातर हरिश्चंद्र चवरे यांच्या परिवाराने मोठी मेहनत घेत रामदास चवरे यांना आपल्या प्रभागातून तब्बल दोन वेळा विजयी केले. रामदास चवरे यांनी गत ग्रामपंचायत निवडणुकीनंतर उपसरपंचपद भूषवले. यावेळी देखील त्यांनी सरपंच पद खेचून घेण्यासाठी याच प्रभागातून निवडणूक लढवली आणि मानाजी माने यांच्या पुतणे दिग्वीजय माने यांना पराभूत केले. हरिश्चंद्र चवरे यांच्या गटाने पक्षश्रेष्ठींना दिलेला शब्द मोठ्या निष्ठेने पूर्ण करत रामदास चवरे यांना सर्वात जास्त मतांनी विजयी केले. त्यामुळे चवरे यांच्या विजयात मोठा वाटा असणाऱ्या हरिश्चंद्र चवरे परिवाराला जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत उमेदवारीची अपेक्षा पक्षश्रेष्ठींकडून आहे. ती अपेक्षा पूर्ण होते की नाही याबाबत चर्चेला उधाण आले आहे.
पंधरा वर्षांपूर्वी पार पडलेल्या पेनुर पंचायत समितीच्या निवडणुकीत हरिश्चंद्र चवरे यांना राष्ट्रवादीने उमेदवारी दिली. मात्र गावातीलच तत्कालीन राष्ट्रवादीच्या दुसऱ्या गटाने पक्षाचा अवसानघात करत चक्क त्यावेळी भाजपचे उमेदवार शंकर वाघमारे यांना विजयी केले. तेव्हांपासूनच पेनुर जिल्हा परिषद गट हा राष्ट्रवादीच्या दृष्टीने बेभरवशाचा गट बनला. विशेष म्हणजे लोकनेते कारखान्याच्या उभारणीच्या प्रसंगी सर्वात जास्त शेअर संकलनाची कामगिरी याच चवरे यांनी पार पाडली तरीही नंतरच्या काळात या चवरे यांच्या परिवाराला कुठेही प्रतिनिधित्व मिळू शकले नाही. मात्र चवरे यांना विरोध करणार्या माने गटाला मात्र पंचायत समितीचे आणि कारखान्याची बरीच पदे महत्वाची मिळाली. ही देखील बाब पेनुर मधील सर्वांना ज्ञात आहे. त्यामुळे माने यांच्या राजकीय पुनर्वसनासाठी नेहमीच समोरच्या विरोधी चवरे गटाने सरती बाजू घेतली आहे. आजही घेत आहेत. त्यामुळे सलग दोनदा ग्रामपंचायत निवडणुकीला ज्येष्ठ नेते मानाजी बापू माने यांचे भाचे असलेल्या रामदास चवरे यांना आपल्या प्रभागातून संधी देणाऱ्या हरिश्चंद चवरे परिवाराला जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत पक्षश्रेष्ठी संधी देणार का याबाबत मोठी उत्सुकता पेनुरवासियांच्या मनामध्ये आहे.
0 Comments