ना शिवसेनेच्या मळ्यात ना भाजपच्या तळ्यात , पक्षापेक्षा निवडणुक नक्की लढण्याची चर्चा राजकारणाच्या खळ्यात
प्रभाग 14 आणि 15 मध्ये मोठा जनाधार असलेल्या गाडे परिवाराकडे सर्वपक्षियांचे लक्ष
मोहोळ ( कटूसत्य वृत्त ) :- गेल्या दोन महिन्यापासून सतत या ना त्या कारणाने चर्चेत असलेल्या प्रभाग 14 आणि 15 मध्ये बऱ्याच राजकीय घडामोडी दिवसेंदिवस घडत आहेत. सध्या शिवसेनेच्या ताब्यात असलेला 15 ताब्यात घेण्यासाठी राष्ट्रवादीच्या हालचाली सुरू आहेत तर राष्ट्रवादीच्या ताब्यात असलेला प्रभाग क्रमांक 14 घेण्यासाठी शिवसेनेच्या हालचाली सुरू आहेत. प्रभाग 14 मध्ये गती वेळी बरच राजकारण घडले. शिवसेनेकडून उमेदवारी घेतलेल्या गाडे परिवाराला केवळ चार मतांनी पराभव पत्करावा लागला. चार मताने झालेला पराभव हा पराभव नव्हताच. भाजपच्या मतविभागणीचा फटका शिवसेनेला बसून या ठिकाणी शालन गाडे यांचा पराभव झाला. पक्षाने उमेदवारी देऊनही पक्षांतर्गत पदाधिकाऱ्यांमध्ये समन्वय नसल्याचा मोठा फटका गाडे यांना बसला. त्यामुळे गाडे हे शिवसेनेवर नाराज असल्याचीही चर्चा काही काळ होती. मात्र नंतर उद्योग विश्वात रमलेल्या गाडे परिवाराने राजकीय क्षेत्राकडे फारसे लक्ष दिले नाही. अनिल गाडे आणि दिनेश गाडे हे प्रभाग 14 आणि 15 या दोन्ही प्रभागात सर्वाधिक जनसंपर्क असलेले दोन युवा चेहरे आहेत. वास्तविक पाहता या कुटुंबाचे इलेक्टिव्ह मेरीट म्हणजे निवडून येण्याची क्षमता मोठी असूनही दोन्ही बंधूंनी कोणत्याही पक्षाकडून इच्छुक होण्याची इच्छा दर्शवली नाही. राष्ट्रवादी आणि सेनेच्या शहरातील नेतेमंडळींनी गाडे यांच्या उमेदवारीबाबत सुरुवातीपासूनच अनुकूलता दर्शवली. मात्र गाडे यांनी ना शिवसेनेला दाद दिली ना राष्ट्रवादीला. त्यामुळे सध्यातरी गाडे परिवार तटस्थ भूमिकेत आहे. यामुळे दोन्ही पक्षाला डावलून तिसऱ्या आघाडीचा पर्याय त्यांच्यासमोर असल्याचे सध्या तरी जाणवत आहे. गाडे यांनी जर प्रभागात निवडणुकीच्या रिंगणात उतरून आव्हान दिले तर ही बाब जरी राष्ट्रवादीला मत विभागणीच्या शक्यतेमुळे सोयीची असली तरी शिवसेनेला मात्र निश्चितपणे गैरसोयीचे ठरणार आहे. राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या काँटे की टक्कर मध्ये गाडे देखील विजयाचा चमत्कार घडवु शकतात. अशी देखील खात्री प्रभागातील अनेकांना अजूनही वाटत आहे. त्यामुळे येत्या काळात गाडे परिवार कोणती भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
वास्तविक पाहता गाडे परिवाराचे मोठे मतदान या प्रभागात असतानाही गाडे परिवाराने अद्याप आपली भूमिका जाहीर केलेली नाही. यावेळी इलेक्टिव्ह मेरिट असलेल्या गाडे परिवाराला शिवसेनेकडून उमेदवारी मिळेल अशी काही दिवस चर्चा होती. तर नंतरचे काही दिवस गाडे यांच्या राष्ट्रवादीमधील संपर्कामुळे यावेळी गाडे राष्ट्रवादीतून लढणार अशी ही चर्चा सुरू झाली. मात्र दोन्ही पक्षाला चार हात दूर ठेवत गाडे बंधूनी तटस्थ घेतलेली भूमिका सध्या सर्वात जास्त चर्चेची ठरत आहे. प्रभाग 14 मधून अनिल गाडे इच्छुक असून प्रभाग पंधरा मधून ऐनवेळी दिनेश गाडी देखील निवडणुकीच्या रिंगणात उतरू शकतात. प्रभाग 14 आणि 15 हे एकमेकाला लगत असल्यामुळे गाडे बंधू येत्या काळात काय भूमिका घेणार ? हा सध्यातरी प्रभाग 14 आणि 15 मध्ये मोठा उत्सुकतेचा विषय आहे.
0 Comments