अनिल गाडे निवडणूक तर लढणारच मात्र कोणत्या पक्षाकडून याबाबत प्रचंड उत्सुकता

प्रभाग 15 मधुन लढणार असले तरी 14 मध्ये निर्णायक भूमिकेत
मोहोळ (प्रदीप घोडके): मोहोळ नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी सर्वपक्षीय रणधुमाळीला प्रारंभ झाला आहे. काही दिग्गज उमेदवार मात्र अद्याप आपली भूमिका स्पष्ट करताना दिसत नाहीत. काही दिग्गज असलेले इच्छुक उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचे निश्चित आहे. मात्र त्यांचा पक्ष अद्याप ठरला नाही. यावरून ते कोणत्या पक्षाकडून उमेदवारी घेऊन निवडणुकीच्या रिंगणात उतरणार याबाबत मोठी उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
गतवेळी प्रभाग 14 मधून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या गाडे परिवारातील सदस्य तथा मोहोळ शहरातील प्रथितयश युवा उद्योजक अनिल गाडे हे प्रभाग 15 मधून निवडणूक लढण्याच्या तयारीत असल्याचे समजते. गत निवडणुकीत प्रभाग 14 हा ओबीसी महिला प्रवर्गासाठी राखीव असल्याने गाडे परिवारातील अनिल गाडे यांच्या मातोश्री शालन रामचंद्र गाडे या शिवसेनेच्या धनुष्यबान चिन्हावर निवडणूक रिंगणात उतरल्या होत्या. या निवडणुकीत केवळ पाच मतांनी त्यांचा निसटता पराभव झाला. पक्षाने त्यांना उमेदवारी दिली होती. मात्र यातील अंतर्गत गटबाजीचे राजकारण आणि प्रभागातील पक्ष कार्यकर्त्यांची संदिग्ध भूमिका यामुळे त्यांना निसटता पराभव पत्करावा लागला. त्यामुळे गत निवडणुकीच्या निकालापासून अनिल गाडे हे शिवसेनेपासून चार हात दूरच होते.जरी ते शिवसेनेपासून दूर असले तरी ते राष्ट्रवादी सोबतही नव्हते. सध्या मात्र ते तटस्थ भूमिकेत आहेत. प्रभाग 15 हा सध्या ओबीसी प्रवर्गासाठी आरक्षित झाला आहे. त्यामुळे प्रभाग 15 मधून त्यांनी निवडणूक लढवण्याचे संकेत दिले आहेत. गाडे परिवारातील अनिल गाडे निवडणूक लढवणार त्यांचे बंधु दिनेश गाडे निवडणूक लढवणार याबाबत मोठी उत्सुकता आहे.
निवडणुकीत प्रभाग 14 मध्ये मोठे राजकारण घडल्याची चर्चा त्यावेळी झाली पक्षाकडून उमेदवारी मिळूनही पक्षाची काही मते गाडे यांना मिळाली नाहीत अशी चर्चा मोठ्या चवीने झाली. त्यामुळे गाडे हे शिवसेनेवर त्याकाळी नाराज झाले होते. त्यामुळे यंदाच्या वेळी ते शिवसेनेकडून उमेदवारी घेणार की नाही याबाबत थोडी साशंकताच आहे. सध्या गाडे राष्ट्रवादी आणि शिवसेना या दोन्ही पक्षाबरोबर नसल्याचे जाणवत आहे. यावरून ते एखाद्या अपक्ष आघाडीतूनही आपल्या उमेदवारीचा विचार करू शकतात.
मोहोळ शहराच्या दक्षिण भागातील प्रभाग क्रमांक 14 आणि 15 मध्ये गाडे परिवाराचा मोठा जनसंपर्क आहे. त्यामुळे गाडे यांनी कोणत्याही पक्षाकडून निवडणूक लढवणार त्या पक्षाला मोठा राजकीय फायदा होऊ शकतो. त्यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्ष गाडे यांची पडद्याआड मनधरणी करत असल्याचे सध्या जाणवत आहे. गाडे ऐनवेळी शिवसेना अथवा अन्य पक्षाचेही उमेदवार होऊ शकतात.मात्र गाडे यांच्या मनात दडले आहे तरी काय ? गाडे गत निवडणुकीच्या वेळी नेमक्या कोणत्या मुद्द्यावरून दुखावले आहेत. याबाबत काही थांगपत्ता कुणालाच लागायला मार्ग नाही. ते त्या काळात ते कोणता निर्णय घेणार कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढवणार याकडे प्रभाग 14 आणि 15 मधील कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.
0 Comments