Hot Posts

6/recent/ticker-posts

पंढरपूर - कुरुल रस्त्याकडे संबंधितांचा कानाडोळा ; सुयश बचूटे यांचे थेट पीडब्ल्यूडीला पत्र

 पंढरपूर - कुरुल रस्त्याकडे संबंधितांचा कानाडोळा
सुयश बचूटे यांचे थेट पीडब्ल्यूडीला पत्र

राष्ट्रीय महामार्गानुसार पुनर्बांधणी करण्याची मागणी
आ.यशवंत (तात्या) माने यांच्या प्रयत्नांना हवे जनतेच्या आवाजाचे पाठबळ

          सौंदणे (अनिल राऊत): दररोज हजारो प्रवाशांची ये-जा असलेल्या पंढरपूर ते कुरुल रस्त्याची अवस्था गेल्या कित्येक वर्षांपासून आहे तशीच आहे. याचा अतोनात त्रास या रस्त्यावरुन प्रवास करणाऱ्या प्रवाशांना नाहक सहन करावा लागत आहे.या रस्त्याकडे सर्वसंबंधितांनी कायम कानाडोळा केल्याने आता वरकुटे ता.मोहोळ येथील सुजाण नागरिक सुयश बचूटे यांनी थेट पीडब्ल्यूडीला ईमेल पाठवून या रस्त्याला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा देऊन लवकरात लवकर पुनर्बांधणीचे काम सुरु करावे अशी मागणी केली आहे.

          पंढरपूर तिर्हे सोलापूर पैकी कुरुल ते कामती या रस्त्याची पूणे - मोहोळ - विजापूर या महामार्गामुळे तर कामती - तिर्हे - सोलापूर या रस्त्याची मिरज - सोलापूर या महामार्गामुळे दुर्दशा संपलेली आहे.मात्र उर्वरीत पंढरपूर ते कुरुल रस्त्यावरुन प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या नशिबी नुसते खड्डे आणि ठोसाच आहेत.

          पंढरपूरचे विठ्ठल,सोलापूरचे सिद्धेश्वर व अक्कलकोटच्या स्वामी समर्थांना जाण्यासाठी भाविकांना याच रस्त्यावरुन जावे लागते.तसेच याच रस्त्यावरुन जिल्ह्यातील अनेक साखर कारखान्यांची ऊस वाहतूक होते.या शिवाय या भागातील शेतकरी,दुध उत्पादक,छोटे मोठे उद्योजक यांना याच रस्त्यावरुन आपल्या मालाची ने - आण करावी लागते.मात्र या रस्त्याची अवस्था फारच बिकट असल्याने दुचाकी,चार चाकी वाहनचालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.

          तरी मोहोळ विधानसभा मतदार संघाचे आमदार यशवंत ( तात्या ) माने यांनी यासंबंधी केलेल्या अर्जावर तात्काळ अंमलबजावणी करुन या रस्त्याची राष्ट्रीय महामार्गानुसार पुनर्बांधणी करावी असे सुयश बचूटे यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.

          हा रस्ता माढा व मोहोळ या दोन विधानसभा मतदारसंघात विभागला गेला असल्याने दोन्ही आमदारांनी मिळून या रस्त्यासाठी पाठपुरावा करणे गरजेचे आहे.मोहोळचे आमदार यशवंत ( तात्या ) माने यासाठी प्रयत्नशील आहेत मात्र माढ्याचे आमदार बबनदादा शिंदे हे काही प्रयत्न करताना दिसत नाहीत.म्हणून आता जनतेतूनच आवाज उठवायला हवा आणि आ.यशवंत ( तात्या ) माने यांच्या प्रयत्नांना पाठबळ द्यायला हवे.याचीच सुरुवात म्हणून मी पीडब्ल्यूडीला पत्र पाठवले आहे. - सुयश बचूटे (वरकुटे ता.मोहोळ)

Reactions

Post a Comment

0 Comments