Hot Posts

6/recent/ticker-posts

सक्तीच्या वीज वसुलीच्या व विजतोडणीच्या विरोधात संभाजी ब्रिगेड व स्वाभिमानी आंदोलनाच्या पवित्र्यात

 सक्तीच्या वीज वसुलीच्या व विजतोडणीच्या विरोधात संभाजी ब्रिगेड व स्वाभिमानी आंदोलनाच्या पवित्र्यात


करमाळा  ( कटूसत्य वृत्त ) :-   सध्या तालुक्याच्या ग्रामिण भागात वीज वितरण कंपनीची सुरू असलेली सक्तीची तुघलकी वीज बिल वसुली तात्काळ थांबवून तोडलेले कनेक्शन त्वरित न जोडल्यास संभाजी ब्रिगेड व स्वाभिमानी शेतकरी संघटना 4 मार्च रोजी रास्ता रोको आंदोलन करणार असल्याची माहिती संभाजी ब्रिगेड तालुकाध्यक्ष अमित घोगरे व स्वाभिमानीचे तालुकाध्यक्ष सुदर्शन शेळके यांनी दिली. 

        वीज वितरण कंपनीचे अभियंता  तसेच तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. याप्रसंगी मराठा सेवा संघ तालुकाध्यक्ष अतुल वारे पाटील, राजेंद्र पोळ ,स्वाभिमानीचे जिल्हा कार्याध्यक्ष रवींद्र गोडगे,युवा तालुकाध्यक्ष अमोल घुमरे,तालुका पक्षाध्यक्ष बापूराव फरतडे, नेते दीपक शिंदे,कांतीलाल शिंदे आदी उपस्थित होते.

     याबाबत अधिक माहिती देताना अमित घोगरे म्हणाले की,ग्राहकांना कलम 56 नुसार वीज खंडित करण्याअगोदर शेतकऱ्यांना नोटीस देणे बंधनकारक असताना वीज वितरण कंपनीने अन्यायकारक रित्या वीज कनेक्शन कट केले आहेत.शेतकरी कोरोना महामारीने त्रस्त झाला आहे तसेच  शेतमाल कावडीमोल दराने विकला जात असल्याने शेतकरी वीजबिल भरू शकत नाही. संभाजी ब्रिगेड शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी असून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
    स्वाभिमानीचे तालुकाध्यक्ष सुदर्शन शेळके याबाबत बोलताना म्हणाले की, शेतकऱ्यांना एक न्याय व कारखाने आणि धनदंडग्यांना एक न्याय हे खपवून घेणार नाहीत. सक्तीची वीज बिल वसुली व तोडलेले कनेक्शन त्वरित न जोडल्यास दिनांक 4 मार्च रोजी नगर सोलापूर राज्यमार्गावर  कुंभेज फाटा येथे शेतकऱ्यांना घेऊन रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी यावेळी दिला.

Reactions

Post a Comment

0 Comments