अकलूजच्या शिक्षण प्रसारक मंडळाला उत्कृष्ट शिक्षण संस्था पुरस्कार प्रदान
अकलूज ( कटूसत्य वृत्त ):- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर यांचे वतीने सन-२०२० साठीचा उत्कृष्ट शिक्षण संस्था पुरस्कार अकलूजच्या शिक्षण प्रसारक मंडळाला विद्यापीठाचे कुलपती तथा महाराष्ट्राचे राज्यपाल महामहिम भगतसिंग कोशारी यांच्या ऑनलाईन उपस्थितीत व आ. सुभाष देशमुख, विद्यापीठाच्या कुलगुरु डॉ. मृणालिनी फडणवीस यांचे हस्ते सन्मान पूर्वक प्रदान करण्यात आला.
सदरचा पुरस्कार शिक्षण प्रसारक मंडळाच्या संचालिका स्वरुपाराणी मोहिते पाटील यांनी स्विकारला. यावेळी संस्थेचे सचिव अभिजीत रणवरे, सहसचिव हर्षवर्धन खराडे पाटील, प्राचार्य दत्तात्रय बागडे, माजी प्राचार्य डॉ. आबासाहेब देशमुख हे उपस्थित होते.
विद्यापीठाच्या १६ व्या दिक्षांत समारंभ सोहळयात सदरचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र असे पुरस्काराचे स्वरुप आहे. पुरस्कारानंतर पत्रकारांशी बोलताना स्वरुपाराणी मोहिते पाटील म्हणाल्या, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची सोय व्हावी यासाठी सन १९४८ साली सहकार महर्षि शंकरराव मोहिते पाटील यांनी शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना केली. संस्थेचे कार्यकुशल अध्यक्ष जयसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व सस्थेचे संचालक संग्रामसिंह माहिते पाटील यांच्या सहकार्याने संस्थेने सर्वच विभागात अष्टपैलू कामगिरी केली आहे. विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास हाच संस्थेचा उद्देश राहिला आहे आज संस्थेची अनेक विद्यालये,आधुनिक विद्यालये, विविध क्षेत्राची महाविद्यालये असून ५५ शाखेतून सुमारे ३० हजार ३३९ विद्यार्थी पूर्व प्राथमिक ते पदव्युतरस्तरापर्यंत शिक्षण घेत आहेत. पुणे, रायगड, सोलापूर जिल्हयातील दुर्गम भागातील विद्यार्थ्याना शिक्षणाचा लाभ होत आहे. संस्थेच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त दिनांक ४ ते ७ जानेवारी १९९९ मध्ये आयोजीत केलेल्या आनंदयात्रेची लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंद झाली आहे. तर महाराष्ट्र शासनाने संस्थेस सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल ५ सप्टेंबर २००१ रोजी रु.१ लाख देऊन आदर्श शिक्षण संस्था म्हणूनही गौरविले आहे. संस्थेच्या विजय विद्यार्थी वसतिगृहास सन-२००३-०४ मध्ये शासनाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्राविण्य पुरस्कार रु.३ लाख व प्रमाणपत्र देऊन सन्मानीत केले आहे. तसेच शिक्षण प्रसारक मंडळ व संग्रामसिंह मोहिते पाटील मित्रमंडळाच्या वतीने ३० जानेवारी २००९ रोजी ६३९६ शालेय विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या महालेझीम या खेळाची नोंद जागतीक गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये झालेली आहे. याचबरोबर संस्थेने विज्ञानयात्रा, गौरव भारतीय लोककलेचा, गौरव मराठी मातीचा हा भव्य सांस्कृतिक कार्यक्रम तसेच समाजात देशभक्तीची भावना जागृत व्हावी यासाठी विविध पथकातील संचलनासह दिल्लीच्या धर्तीवर भव्य चित्ररथासह २६ जाने प्रजासत्ताक दिन सोहळे, सहकार महर्षि शंकरराव माहिते पाटील यांची १०१ वी जयंती व कर्मवीर बाबसाहेब माने पाटील यांची ५० व्या पुण्यतिथीनिमित्त आयोजीत रयतेचा राजा राजा शिवछत्रपती हे महानाटय,राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडू तयार व्हावेत यासाठी एस.पी.एम.स्पोर्टस् चॅम्पीयनशिप चे २०१५ पासून आयोजन, दरवर्षी संस्थेतील गुणवंत विद्यार्थी व त्याच्या पालकांचा सत्कार सोहळा इ.भव्य उपक्रम राबविलेले आहे स्था प्रगत असल्याचेही स्वरुपाराणी मोहिते पाटील म्हणाल्या.
शेतकरी ,कष्टकरी यांच्या मुलांना शिक्षण मिळावे यासाठी सहकार महर्षिनी शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना केली. यामुळेच आज संस्थेचे अनेक विद्यार्थी देशसेवा, वैद्यकीय सेवा, मोठे व्यवसाय, सिनेसृष्टी, कलाकार, अभिनेते, विविध पदावर अधिकारी म्हणून नामांकित सेवेत कार्यरत आहेत. याचा संस्थेला अभिमान आहे. संस्थेच्या प्रगतीत सर्व संचालक, सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर, सेवक, सर्व विद्यार्थी व सर्व पालकांचा मोलाचा वाटा आहे.
जयसिंह मोहिते पाटील. अध्यक्ष-शिक्षण प्रसारक मंङळ, अकलूज
0 Comments