तहसील कार्यालय आर्थिक अडचणीत - तहसीलदार अभिजीत पाटील

सांगोला तहसील कार्यालयाकडे लाईट बिल भरण्यासाठी पैसे नाहीत, मग कार्यालय फलक कसे बसविणार ? पत्रकारांनी फलक बसण्यासाठी पैसे जमा करावेत : तहसीलदार अभिजीत पाटील
सांगोला (कटूसत्य वृत्त): सांगोला तहसील कार्यालयाकडे लाईट बिल भरण्यासाठी पैसे नाहीत. तहसील कार्यालयाच्या आवारातील अभिलेख कक्ष अर्थात रेकॉर्ड रूम कार्यालयावरील डीजीटल खराब झाले असले तरी नविन बसविण्याकरिता पैसे कुठून आणणार, असे सांगत पत्रकारांनी डिजिटल बोर्ड बनवण्यासाठी पैसे जमा करावेत असे तहसीलदार अभिजित पाटील यांनी कार्यालय वरील खराब झालेल्या डिजिटल चे फोटो काढत असताना पत्रकारांना सांगितले. त्यामुळे सांगोला तहसील कार्यालय आर्थिक अडचणीत असल्याने तालुक्यातील सर्व गोरगरीब जनता तसेच नागरिकांनी मदत करावी. तसेच लोकप्रतिनिधी यांनी देखील याकडे लक्ष घालावे असे आवाहन आता पत्रकार मंडळींकडून करण्यात आले आहे.
सांगोला तहसील कार्यालय परिसरातील विविध विभागीय कार्यालयावरील नामफलकाची दुरावस्था झाली आहे. यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना तहसील आवारामध्ये प्रवेश केल्यानंतर कार्यालयावर नाम फलक नसल्याने कोणत्या कार्यालयामध्ये माहिती घ्यावी हा प्रश्न पडतो आहे. याबाबत विचारणा करण्यासाठी एखाद्या विभागीय कार्यालयांमध्ये गेले असता, तेथील कर्मचाऱ्यांकडून समोर जावा असे सांगितले जात आहे यामुळे गावातील सर्वसामान्य नागरिकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या नागरिकांच्या त्रासाबद्दल दखल घेऊन सदरचे नामफलकाचे फलक लावणे गरजेचे असताना, व याबाबत वर्तमानपत्राच्या पत्रकारांकडून आवाज उठवण्याचा प्रयत्न केला असताना, वार्तांकनासाठी गेलेल्या पत्रकारांनी अभिलेख कक्ष अर्थात रेकॉर्ड रूम कार्यालयावरील नादुरुस्त व जीर्ण झालेल्या नाम फलकाचा फोटो काढण्याचा प्रयत्न केला असता, तहसील कार्यालयातील आर्थिक अडचणी बाबत तहसीलदार यांनी पत्रकारांना माहिती दिली. एवढेच नव्हे तर सांगोला तालुका तुमचा आहे. पत्रकारांनी व येथील नागरिकांनी नामफलक आणून बसवून द्यावेत. असेही तहसीलदार अभिजित पाटील यांनी सांगितले.
सांगोला तहसील कार्यालय आर्थिक अडचणीत असेल तर सांगोला तालुका महाराष्ट्र नवनिर्माण सेना तहसील कार्यालय दत्तक घेण्यास तयार आहे. अडचणीत असलेल्या सांगोला तहसील कार्यालयास महाराष्ट्र नवनिर्माण सेना सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून देईल. - विनोदभाई बाबर (महाराष्ट्र नवनिर्माण सेना जिल्हा उपाध्यक्ष)
सांगोला तालुका जरी आमचा असला तरी, तालुक्यात होणारा अवैध वाळू उपसा यामधून वसुलदारा मार्फत होणाऱ्या अर्थपूर्ण वाटाघाटी मधून जमा होणारा आर्थिक साठा सर्वच्या सर्व शासनाच्या महसूलामध्ये जमा होत नाही. तरी अवैध वाळू उपसा करणाऱ्यांकडून तहसीलचा वसुलदार यांच्याकडे जमा होणाऱ्या आर्थिक रकमेतून तहसील आवारातील नाम फलक बसून घेण्यास काही हरकत नाही. यामधून निश्चितपणे नामफलक होतील तरीही, लवकरच जिल्हाधिकारी यांच्याकडे तहसील आवार कार्यालयातील नामफलक बसण्यासाठी पत्रव्यवहार करणार आहे. तहसील आवारातील विभागीय कार्यालयातील कामे चिरीमिरी दिल्याशिवाय होत नाहीत. तरीही विज बिल भरणे इतपत पैसे उपलब्ध नाहीत. हे उत्तर पटण्याजोगे नाही. - सुरजदादा बनसोडे (जिल्हा सरचिटणीस आर.पी. आय. तथा नगरसेवक सा.न. पा.)
0 Comments