रेशीम उद्योगासाठी 15 फेब्रुवारीपर्यंत नावनोंदणी करण्याचे आवाहन
25 जानेवारी ते 15 फेब्रुवारी दरम्यान महारेशीम अभियान
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- राज्यात 25 जानेवारीपासून 15 फेब्रुवारी 2021 पर्यंत महारेशीम अभियान राबविण्यात येत आहे. सोलापूर जिल्ह्यात तुती लागवड करून रेशीम कोष निर्मितीसाठी अनुकूल वातावरण आहे. जिल्ह्यातील रेशीम उद्योग करू इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांनी 15 फेब्रुवारी 2021 पर्यंत नावनोंदणी करण्याचे आवाहन रेशीम विकास अधिकारी मच्छिंद्र राऊत यांनी केले आहे.
पहिल्या वर्षी 300 व दुसऱ्या वर्षापासून प्रतिवर्ष प्रती एकरी 800 अंडीपुंज खरेदी रकमेच्या 75 टक्के अनुदान शासन निर्णयानुसार मिळेल. शासन मान्यताप्राप्त बाजारपेठेत कोष विक्री केल्यास आणि अनुदानाचे निकष पूर्ण केल्यास प्रती किलो 50 रूपये अनुदान मिळेल.
अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, भटक्या जमाती (एनटी), विमुक्त जमाती (डीटी), दारिद्र्यरेषेखालील कुटुंबे, महिला प्रधान कुटुंबे, शारीरिक अपंगत्व प्रधान असलेली कुटुंबे, भूसुधार योजनेचे कुटुंबे, इंदिरा आवास योजनेचे लाभार्थी, अल्पभूधारक शेतकरी.
मनरेगा जॉबकार्डधारक असावा.स्वत:च्या लागवडीवर अकुशल म्हणून काम करणे आवश्यक आहे.
तुती लागवडीची कमाल मर्यादा एक एकर आहे.
मनरेगा अंतर्गत एक एकर तुती लागवड, संगोपनगृह व संगोपन साहित्य यासाठी अकुशल आणि कुशल मिळून 3 लाख 26 हजार 790 रूपये तीन वर्षात विभागून दिली जाते. ही रक्कम तहसीलदारकडून लाभार्थींच्या बँक खात्यात जमा केली जाते.
शेतकऱ्याला शेतात केलेल्या कामाची मजुरी आणि लागणारे साहित्य, संगोपनगृहाचे अनुदान, रेशीम कोष विक्रीपासून उत्पन्न मिळते. शेतकरी मनरेगा अंतर्गत व मनरेगाव्यतिरिक्त तुती लागवड करून रेशीम उद्योग करू शकतो. शेतकऱ्यांनी महारेशीम अभियानामध्ये आपली नाव नोंदणी करून घ्यावी. ग्रामपंचायतीने ग्रामसभेत नाव नोंदणी झालेल्या शेतकऱ्यांचा ठराव करून 2021-22 च्या त्रैमासिक आराखड्यात आराखडा पंचायत समितीमार्फत जिल्हा परिषदेला सादर करावा, असे आवाहन राऊत यांनी केले आहे.
अधिक माहितीसाठी रेशीम विकास अधिकारी, जिल्हा रेशीम कार्यालय, 13, उज्ज्वल हौसिंग सोसायटी, मुरारजी पेठ, सोलापूर किंवा दूरध्वनी 0217-2323148, इमेल-reshimsolapur@gmail.com यावर संपर्क करावा.
0 Comments