शेतीपंपासाठी दिवसा वीज पुरवठा करावा..
रात्रीच्या वीजपुरवठा यांनी शेतकरी बांधवांचे जीव धोक्यात
दिवसा वीज पुरवठा न झाल्यास आंदोलन करणार - सुदर्शन गायकवाड यांचा इशारा

मोहोळ (कटूसत्य वृत्त):- भारनियमनाच्या काळात रात्रीचा वीजपुरवठा होत असल्याने अनेक शेतकरी बांधवांना आपला जीव धोक्यात घालून पिकास पाणी द्यावे लागत आहे. प्रसंगी सर्पदंश किंवा बिबट्याच्या सारख्या हिंस्त्र श्वापदाच्या हल्ल्यात शेतकऱ्यांना जखमी व्हावे लागते.त्यामुळे महावितरण प्रशासनाने शेतकरी बांधवांच्या संयमाचा अंत न पाहता दिवसा वीजपुरवठा करावा. अशी आग्रही मागणी अखिल भारतीय छावा युवा संघटनेचे जिल्हाध्यक्ष तथा मोहोळ येथील प्रभाग क्रमांक ११ मधील राष्ट्रवादीचे युवा नेते सुदर्शन गायकवाड यांनी केली आहे.
याबाबत माध्यमांशी संवाद साधताना सुदर्शन भाऊ गायकवाड पुढे म्हणाले की राज्यात परतीच्या पावसाने दमदार हजेरी लावल्याने विहिरींची भूजल वाढण्याबरोबरच धरणेही काठोकाठ भरल्याने शेतकऱ्यांत उत्साह संचारला आहे. शेतकऱ्यांची रब्बी पिकांची उभारणी अंतिम टप्प्यात आली आहे. आता गहू, हरभरा, मका, ज्वारी आदी रब्बी पिके तर भाजीपाला व तत्सम पिकांची उभारणी अंतिम टप्प्यात आली असल्याने या उभारलेल्या पिकांना पाणी भरण्यास प्रारंभ झाला आहे. मात्र त्याच वेळेस राज्य महावितरण कंपनीने आपली सालाबाद प्रमाणे दाखवली जाणारी कला दाखविण्यास प्रारंभ केला आहे.दिवसा कायमच वीज गायब असते तर रात्री वीज पुरवठा करून शेतकऱ्यांना वेठीस धरण्यास महावितरण कंपनीने प्रारंभ केला आहे.सध्या रात्रीच्या वेळी थंडीत मोठी वाढ झाली आहे. त्यातच बिबटे, वाघ व रानडुकरे या रानटी प्राण्यांचा संचार वाढल्याने शेतकऱ्यांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे रात्रीच्या वेळी पिकास पाणी भरण्यास जाणे हि खूपच जोखमीची बाब ठरत आहे.या बाबत महावितरण कंपनीस शेतकरी बांधवांनी कल्पना देऊनही शेतकऱ्यांचा कैवार कोणीही घेताना दिसत नाही हि दुर्भाग्याची गोष्ट असून महावितरण कंपनीने दिवस भारनियमन करून वीज पुरवठा करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा. अन्यथा अखिल भारतीय छावा युवा संघटनेच्या माध्यमातून मोहोळ शहर आणि तालुक्यातील शेतकरी बांधवांच्या दिवसाच्या वीजपुरवठा साठी तीव्र स्वरूपात आंदोलन केले जाईल असा इशारा सुदर्शन गायकवाड यांनी माध्यमांशी बोलताना दिला.
याबाबत मोहोळ महावितरण कार्यालयात लेखी स्वरूपातील निवेदन शहरातील शेतकरी बांधवांच्या समक्ष देणार असून याबाबत महावितरणचे योग्य ती कार्यवाही करून शेतकरी बांधवांना दिवसाचा वीजपुरवठा सुरू ठेवावा असेही सुदर्शन गायकवाड यावेळी म्हणाले.
गेल्या अनेक वर्षापासून अखिल भारतीय छावा युवा संघटनेच्या माध्यमातून आम्ही सर्व पदाधिकारी शेतकरी आणि विद्यार्थी बांधवांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी सदैव तत्पर आहोत. महावितरण कंपनीने शेतकऱ्यांना आपला रब्बी हंगाम वाचविण्यासाठी दिवसा विज पुरवठा करावा अशी मागणी आम्ही मोहोळ येथील येथील उपअभियंता यांचेकडे आपण करणार आहोत. एरवी विविध प्रश्नावर आंदोलने करणाऱ्या इतर संघटना या शेतकऱ्यांच्या रात्रीच्या वीजपुरवठा संदर्भात एकत्र का येत नाहीत ? त्यामुळे येत्या काळात मोहोळसह संपूर्ण जिल्ह्यातील शेतकरी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेऊन संयुक्त आंदोलनाची निर्मिती करून रात्रीच्या काळात होणारे भारनियमन थांबवुन शेतकरी बांधवांना सुरक्षितरित्या दिवसा शेती पंपाच्या पुरवठा व्हावा यासाठी मी वैयक्तिकरित्या प्रयत्नशील राहणार आहे. - सुदर्शन गायकवाड (जिल्हाध्यक्ष अखिल भारतीय छावा युवा संघटना)
0 Comments