Hot Posts

6/recent/ticker-posts

मराठी भाषा विभागातर्फे नवलेखकांसाठी कार्यशाळा

मराठी भाषा विभागातर्फे नवलेखकांसाठी कार्यशाळा


मुंबई, (कटूसत्य. वृत्त.): मराठी भाषा विभागाच्यावतीने नवलेखकांसाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. आठवडाभर चालणाऱ्या या कार्यशाळेतून नवलेखकांना ज्येष्ठ साहित्यिकांचे मार्गदर्शन लाभणार आहे. या कार्यशाळेस मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

शासनाच्या साहित्य आणि संस्कृती मंडळ व विश्व मराठी परिषद या संस्थेच्या संयुक्त विद्यमाने 10 ते 16 डिसेंबर 2020 या सप्ताह कालावधीत नव लेखकांसाठी कथा, कविता, संशोधन, अनुवाद, ब्लॉग लेखन अशा वैविध्यपूर्ण विषयांवर निःशुल्क लेखन कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्ताने प्रथमच नवलेखकांच्या कार्यशाळांना जागतिक व्यासपीठ मिळणार आहे.

मराठी साहित्यविश्वातील अनेक नवलेखक या ऑनलाईन लेखन कार्यशाळांच्या माध्यमातून एकमेकांशी जोडले जाणार आहेत. मराठी साहित्यातील समृद्ध कथा, कविता, नाटक, कादंबरी, बालवाङ्मय व ललितगद्य प्रकारांत आपल्या लेखणीच्या माध्यमातून प्रवेश करणाऱ्या नवलेखकांना ज्येष्ठ प्रतिभावंत साहित्यिकांचे या निमित्ताने मार्गदर्शन लाभणार आहे. अशी माहिती मराठी भाषा विभागामार्फत देण्यात आली आहे.

भागवत परंपरेतल्या सप्ताहातून वारकरी जसे संताच्या सहिष्णू आणि समताधिष्ठित शिकवणुकीची ऊर्जा घेऊन बाहेर पडतात, तशीच लेखनाची, सृजनाची नवी उर्मी व ऊर्जा, प्रेरणा घेऊन या कार्यशाळेतून नवलेखक बाहेर पडतील, असा आशावाद श्री. देसाई यांनी व्यक्त केला.

Reactions

Post a Comment

0 Comments