शेतकऱ्यांनी शास्त्रोक्त व नियोजन बद्ध शेती करावी - डॉ. कसपटे

बार्शी (कटूसत्य. वृत्त.): माती हवामान उपलब्ध पाणी यांचा अभ्यास करून शास्त्रोक्त पद्धतीने व नियोजनबद्ध शेती केल्यास शेतकऱ्यांना यश मिळते. शेतकऱ्यांनी शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आंतरराष्ट्रीय बाजारात निर्यातक्षम उत्पादने बनवावीत असे आवाहन केंद्रीय पुरस्कार विजेते, प्रगतिशील शेतकरी एन एम के वन जातीच्या सिताफळाचे संशोधक डॉ. नानासाहेब कसपटे यांनी केले.
राष्ट्रीय किसान दिनानिमित्त मधुबन फार्म अँड नर्सरी व अखिल भारतीय सीताफळ महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शेतकरी मेळावा व चर्चासत्रात मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून प्रगतिशील महिला शेतकरी सपना मगर व विश्वनाथ देवरमी उपस्थित होते. यावेळी डॉ. कसपटे यांनी लागवड कशी करायची, रोपांमधील अंतर, रोपांचे संगोपन कसे, छाटणी कशी करायची, पाण्याचे व्यवस्थापन, मृगबहर, खत व्यवस्थापन, फळे तोडणी, ग्रेडिंग, पॅकेजिंग याबाबत उपस्थित शेतकऱ्यांना सविस्तर माहिती दिली.
यावेळी बोलताना माळशिरस च्या सपना मगर यांनी दीड एकर क्षेत्रामध्ये सीताफळाचे उत्पादन घेऊन साडेदहा लाख रुपये नफा कसा मिळवला हे सांगत आपल्या यशोगाथेमध्ये आलेल्या अडचणी व त्यावर केलेली उपाययोजना याचे वर्णन केले. यावेळी बोलताना अक्कलकोटचे विश्वनाथ देवरमी यांनी सेंद्रिय शेती, डिकंपोजर, जिवाणू कल्चर या विषयी माहिती दिली.
0 Comments