Hot Posts

6/recent/ticker-posts

वर्षानुवर्ष फक्त पक्षकार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांचा नेत्यांना सवाल : "सतरंज्या उचलत आम्ही किती दिवस रहायचं" ? "सांगा नेते आम्ही नगरसेवक कधी व्हायचं "?

वर्षानुवर्ष फक्त पक्षकार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांचा नेत्यांना सवाल :
"सतरंज्या उचलत आम्ही किती दिवस रहायचं"?
"सांगा नेते आम्ही नगरसेवक कधी व्हायचं "?

मोहोळ (कटूसत्य. वृत्त.): सध्या येत्या काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या मोहोळ नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी राजकीय वातावरण निर्मितीला जोर आला आहे.यापूर्वी निवडून आलेल्या नगरसेवकांचा रुबाब पाहून आता त्यांच्या कार्यकर्त्यांनाही आपणही नगरसेवक व्हावं असं वाटू लागलं आहे. त्यामुळे यंदा काहीही करून नगरसेवक व्हायचंच नगरपरिषदेत जायचं अशी पूर्वतयारी अनेक दिग्गज कार्यकर्त्यांनी आपापल्या प्रभागात सुरू केली आहे. आरक्षणाची सोडत जरी नसली तरीसुद्धा आपल्या सोयीचा एखादा कार्यकर्ता उभा करून त्याला नगरसेवक बनवायचं आणि त्याच्याकडून राजकीय कारभारपण करायचा मानस अनेक चाणाक्ष कार्यकर्त्यांनी मनामध्ये आखला आहे.

प्रत्येक पक्षाच्या पक्षश्रेष्ठींना त्या त्या पक्षातील प्रामाणिक कार्यकर्ते म्हणत आहेत " सांगा नेते तुमच्या सतरंज्या उचलत आम्ही किती दिवस रहायचं अन आम्ही नगरसेवक कधी व्हायचं ? जरी मोहोळ नगरपरिषदेचे सतरा प्रभाग असले तरी प्रत्येक प्रभागात दहा जरी धरले तरी जवळपास तब्बल पावणे दोनशे उमेदवार या निवडणुकीत गुडघ्याला बाशिंग बांधून निवडणुकीची तयारीला लागले आहेत.

गत निवडणूक ही नगरपरिषद स्थापन झाल्यानंतर पहिलीच निवडणूक होती त्यामुळे नगरसेवक पदाचे अधिकार काय फायदे काय तोटे काय याचे ज्ञान बऱ्याच जणांना नव्हते त्यामुळे नगरसेवक पदाच्या निवडणुकीपासून अनेक सावध कार्यकर्ते चार हात दूरच राहिले. मात्र गत पाच वर्षातील नगरसेवक पदाचा रुबाब, प्रभागातील कोट्यावधीची कामे, अप्रत्यक्ष करता येऊ शकणारी ठेकेदारी यामुळे आपल्याला देखील राजकारणात सोन्याचे दिवस येऊ शकतात असा अंदाज आता अनेक किंगमेकर कार्यकर्त्यांना येऊ लागला आहे. त्यामुळे आता आपणही निवडणूक लढवायचीच भले मग कोणत्या पक्षाने उमेदवारी देवो अथवा न देवो आपण स्वबळावर प्रभागात निवडून येऊ शकतो. असा आत्मविश्वास असणारे अनेक दिग्गज कार्यकर्ते आपापल्या प्रभागात साखर पेरणीच्या कामाला लागले आहेत. 

गत पाच वर्षांत नगर परिषदेतील अनेक नाटयमय घडामोडी, शिवाय निधी वाटपामधील कलगीतुरा सर्वांनीच उघड्या डोळ्यांनी पाहिला.त्याचबरोबर निवडणुकीनंतर पाच वर्षाच्या काळात झालेला घसघशीत राजकीय फायदा आता अनेकांना आपल्यालाही मिळावा असे वाटत आहे. त्यामुळे मोहोळ नगर परिषदेच्या येत्या निवडणुकीत विक्रमी उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची चिन्हे आहेत. 

अत्यंत महत्त्वाची बाब म्हणजे या नगर परिषदेच्या निवडणुकीतील विजयी नगरसेवकांना पुढील काळात होणाऱ्या विधान परिषदेच्या निवडणुकीत मतदानाचा हक्क प्राप्त होणार आहे. कारण विधानपरिषद निवडणुक हि मोठ्या प्रमाणात रुसवे-फुगवे नाराजी दूर करण्यासाठी आपल्याला काय हवं काय नको मिळवून देणारी असते. त्यामुळे या निवडणुकीत काहीही केलं तरी विजयी होऊन या विधानपरिषदेच्या मतदानाचा हक्क बजावायचाच अशी ही स्वप्ने आताचा अनेकांना पडू लागली आहेत. त्यामुळे अनेक छोट्या मोठ्या कार्यक्रमात असे इच्छुक नगरसेवक आतापासूनच सर्वांना नमस्कार चमत्कार काय हवं काय नको बघू लागले आहेत हे मात्र नक्की.

Reactions

Post a Comment

0 Comments