Hot Posts

6/recent/ticker-posts

कधी मिळणार मोहोळच्या ग्रामीण रुग्णालयाला अत्याधुनिक सोयीसुविधा? ; मोहोळ-सोलापुर मार्गावर आणखी एका सुसज्ज ट्रामा सेंटरची गरज

 कधी मिळणार मोहोळच्या ग्रामीण रुग्णालयाला अत्याधुनिक सोयीसुविधा? ; मोहोळ-सोलापूर मार्गावर आणखी एका सुसज्ज ट्रामा सेंटरची गरज

मोहोळ (साहील शेख)(कुटूसत्य. वृत्त.): सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावर मोहोळ-सोलापूर दरम्यान वारंवार होणार्‍या अपघातामुळे हा महामार्ग मृत्युचा महामार्ग बनला आहे. त्यामुळे या महामार्गावर वडवळ ते सावळेश्‍वर दरम्यान सुसज्ज ट्रामाकेअरची उभारणी प्रशासकिय पातळीवरुन होणे गरजेचे आहे. जखमी रुग्णानां मृत घोषित करण्यापलिकडे कोणतीही उच्च दर्जाच्या उपचाराची सोय मोहोळ ग्रामीण रुग्णालयात उपलब्ध नाही. त्यामुळे गंभीर अपघात झाला असता केवळ खरचटलेल्या अपघात ग्रस्तांना बॅडेज लावण्या इतपतची सुविधा मोहोळला उपलब्ध आहेत. उर्वरित नव्वद टक्के अपघात ग्रस्तांना सोलापुर येथेच उपचारासाठी हालवावे लागते. त्यामुळे असे रुग्ण सोलापुर येई पर्यत वाटेतच आपला शेवटचा श्‍वास घेतात. यावर महत्वाचा प्रशासकिय तोडगा काढून राज्य शासनाने केंद्राच्या निधीतुन वडवळ परिसरात सुसज्ज ट्रामा केअर सेंटर हॉस्पीटलची उभारणी करण्याची मागणी आता जोर धरत आहे. या महत्वाच्या प्रश्‍नासाठी तालुक्यातील सर्व पक्षिय नेते मंडळी तसेच सामाजिक घटकांनी एकत्र येऊन पाठपुरावा करणे गरजेचे आहे. 

या बाबत अधिक माहिती अशी की, मोहोळ हे सोलापुर-पुणे  राष्ट्रीय महामार्गावरील महत्वाच्या तालुक्याचे ठिकाण आहे. दोन राष्ट्रीय महामार्ग जात असल्याने जड वाहने तसेच तिर्थ क्षेत्राला जाणारे मार्ग असल्याने याठिकाणी भाविकांची वाहने, शैक्षणिक वाहणे यांची मोठी गर्दी असते. पुर्वीचा असणारा मुंबई ते हैद्राबाद हा राष्ट्रीय महामार्ग  आता महामार्ग क्र. 65 झाला आहे. शिवाय पुणे-सोलापुर चार पदरी झाला आहे. सदरचा महामार्ग चार पदरी होऊनही अपघता मधील मृतांचे प्रमाण आहे तेच आहे. मार्ग जरी प्रशस्त झाला तरी वाहनांचे वेगाचे प्रमाण वाढल्याने अपघाताचे प्रमाण कमी होऊन मृताचे प्रमाण वाढले. कारण वाहनांच्या गतीमुळे ज्या ठिकाणी एक मयत चार जखमी पुर्वी होत असत, त्याठिकाणी आता जिवघेण्या वेगाने चार मयत एक जखमी अशी भयानक स्थिती निर्माण झाली आहे. याला जबाबदार केवळ मोहोळची आरोग्य व्यवस्था आहे. अपघात स्थळावरुन जखमींना उचलुन मेनरोडने गर्दीचा रस्ता कापत ग्रामिण रुग्णालयात अ‍ॅम्ब्युलन्स आणली जाते. त्यानंतर अ‍ॅम्ब्युलन्स पुन्हा जखमींना घेऊन सोलापुर च्या दिशेने धावते. सोलापुर ला जाण्यासाठी अ‍ॅम्ब्युलन्सला पंचवीस ते तीस मिनिटे लागतात. पंधरा मिनिटे मोहोळला आणण्यासाठी तर पंधरा मिनिटे ग्रामिण रुग्णायात प्रथमोपचारासाठी तेही अरोग्य अधिकारी असतील तरच.. म्हणजे अपघात झाल्यापासुन सोलापुर मध्ये पेशंटला आय.सी.यु मध्ये दाखल करेपर्यंत तब्बल दिड ते दोन तासांचा अवधी लागतो. याच अवधीत बिचार्‍या गंभीर जखमीची प्राण ज्योत मालवते. त्यामुळे हे दोन तास वाचण्यासाठी मोहोळ ते वडवळ परिसरात महामार्गालगत राज्य व केंद्र शासनाने सुसज्ज ट्रामा केअर सेंटरची उभारणी करणे आता काळाची गरज आहे.

दर महिन्याला मोहोळ ते सोलापुर दरम्यान मोठ-मोठे अपघात होतात. बहुतांश अपघात रात्री दहा नंतरच होतात. रात्रीच्या वेळी मदत वेळेवर मिळु शकत नाही. मोहोळ ग्रमीण रुग्णालयाची वैद्यकिय व्यवस्थाच सलाईनवर असल्याने बिचार्‍या जखमींना आपला जिव गमवावा लागत आहे. किमान आता तरी जिल्हा स्तरावरुन याबाबत योग्य ती कार्यवाही पुर्ण करुन मोहोळ ते सोलापूर या मार्गा वर स्वंतत्र ट्रामा केअर सेंटर बाबत योग्य ती पाऊले उचलने क्रमप्राप्त ठरणार आहे. याबाबत सर्वपक्षीय पदधिकार्‍यांनी पक्षीय मतभेद विसरुन एकत्र येणे गरजेचे आहे.
Reactions

Post a Comment

0 Comments