कोरोनाच्या पार्श्वभूमीवर व्यापाऱ्यांनी आणि नागरिकांनी ठरवून दिलेल्या नियमांचे पालन करून दिवाळीची खरेदी करावी-प्रांताधिकारी उदयसिंह भोसले
सांगोला (जगन्नाथ साठे) येत्या काही दिवसांवर दिवाळी हा सर्वांत मोठा सण येत आहे. या दिवाळीच्या निमित्ताने सांगोला आणि मंगळवेढा तालुक्यातील नागरिकांनी आणि व्यापाऱ्यांनी शासनाने ठरवून दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करून हा सण साजरा करावा, असे आवाहन प्रांताधिकारी उदयसिंह भोसले यांनी दोन्ही तालुक्यातील नागरिकांना आणि व्यापाऱ्यांना केले आहे.
गेल्या आठ महिन्यांपासून जगाला भेडसावणाऱ्या कोरोनाने थैमान घातले आहे. सांगोला आणि मंगळवेढा तालुक्यातील कोरोनाची संख्या घटत चालली आहे. तरीही नागरिकांनी कोणत्याही पद्धतीचा हलगर्जीपणा न दाखविता,शासनाने ठरवून दिलेल्या सर्व नियमांचे पालन करून दिवाळी सण साजरा करावा.दोन्ही तालुक्यातील काही गावात मोठ्या बाजारपेठा असून विशेषतः त्या गावात या सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन झाले पाहिजे,असे ही उदयसिंह भोसले म्हणाले.
जागतिक आरोग्य संघटना आणि आरोग्यावर काम करणाऱ्या अनेक संस्थानी दुसरी लाट येण्याची शक्यता व्यक्त केली आहे. त्या पार्श्वभूमीवर सांगोला आणि मंगळवेढा शहर आणि तालुक्यातील मोठ्या व्यापारीपेठा असणाऱ्या गावातील नागरिकांनी सोशल डिस्टन्स ठेवणे,मास्क वापरणे,सॅनिटायझरचा वापर करणे,गर्दीची ठिकाणे टाळणे,आदि नियमाचे कडक पालन करावे, तर व्यापाऱ्यांनी ग्राहकांना योग्य अंतरावर उभे करून देवघेव करावी,आपल्या दुकानात येणाऱ्या ग्राहकांचे रजिस्टर ठेवावे,स्वतः आणि इतरांना ही मास्कचा वापर करण्यास सांगावे,हॅन्डग्लोजचा वापर करावा, सॅनिटायझर चा वापर करावा, अशा ही सूचना या वेळी उदयसिंह भोसले यांनी दिल्या.
0 Comments