Hot Posts

6/recent/ticker-posts

अकलूज पोलिसांची वेगवान कामगिरी ! ; चार तासात खुनी गजाआड

अकलूज पोलिसांची वेगवान कामगिरी ! 
चार तासात  खुनी गजाआड

अकलूज (क.वृ.): माळशिरस तालुक्यात पानिव येथील घडलेल्या विदारक हत्येमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. सविस्तर वृत्त असे की दिनांक १८ नोव्हेंबर २०२० रोजी सायंकाळी ७.३० वा. चे सुमारास संभाजी महादेव बाबर वय ४० वर्ष राहणार पाणीव तालुका माळशिरस गिरझणी तलावात माशाचे जाळे घेऊन गेला होता, तो परत न आल्याने त्याबाबत मिसिंग ५९ /२०२० दिनांक १९ /११ /२०२० रोजी दाखल असून दिनांक २१ /११ /२०२० रोजी सकाळी ७.३० वा.चे  सुमारास संभाजी महादेव बाबर हा गिरझणी तलावातील पाण्यात मयत स्थितीत तरंगत असताना मिळून आला. त्याचा पंचनामा करीत असताना त्याचे पाठीवर शर्टामध्ये चार दगड ठेवलेले व हनुवटीच्या खाली कापीव घावाची जखम व तळ्याच्या पश्चिम बाजूस ५० फूट अंतरावर रक्त ठिकठिकाणी पडलेले दिसले. यावरून त्याचा कोणीतरी अज्ञात इसमाने अज्ञात कारणावरून अज्ञात हत्याराने खून करून त्याचे प्रेत पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने तलावाच्या पाण्यात फेकून दिले म्हणून वगैरे मजकूरचे फिर्यादीवरून अज्ञात आरोपीविरुद्ध भा.द.वि.सं.क ३०२,२०१ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.

सदर गुन्ह्यातील अज्ञात आरोपीचा शोध घेणे पोलिसांना आव्हानात्मक होते. परंतु  सोलापूर ग्रामीणचे पोलिस अधिक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर पोलिस अधिक्षक अतुल झेंडे , पंढरपूर विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी विक्रम कदम, अकलूज विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी नीरज राजगुरू  यांनी दिलेल्या मार्गदर्शक सूचना प्रमाणे अकलूजचे पोलिस निरीक्षक भगवान निंबाळकर हे  स्वतः गिरझणी तळ्यावर ठाण मांडून बसून पोलीस ठाणे कडील तीन पथके तयार केली. त्यामध्ये ४ अधिकारी व १९ पोलिस अंमलदार यांना सुचना देवून अज्ञात  आरोपींचा व संशयित इसमाबाबत गोपनीय बातमीदारामार्फत माहिती काढून स्वतः त्यांचे बरोबर फिरून आरोपींचा शोध घेऊन आरोपी भालचंद्र ज्योतीराम कोठावळे वय ३७ वर्षे व त्याचे सोबत एक विधी संघर्षीत बालक दोघे रा.पानीव ता.माळशिरस यांनी संभाजी महादेव बाबर वय ४० वर्षे रा.पानीव ता. माळशिरस हा भालचंद्र यांच्या पत्नीकडे छेड काढतो याचा आरोपी भालचंद्र यांचे डोक्यात राग होता. त्याने संभाजी बाबर याचा कोयत्याने गळ्यावर वार करून खून करून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने व कोणास कळू नये याकरिता त्याचे प्रेत तलावातील पाण्यात फेकून दिले असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्याने सदर आरोपींना ४ तासाच्या आतच पकडून त्यांना पोलीस ठाण्यात आणून त्यांच्याकडे चौकशी केली असता ते पहिल्यांदा उडवाउडवीची उत्तरे देऊ लागली परंतु त्यांना अधिक विश्वासात घेऊन कसून चौकशी केली असता त्यांनी सदरचा गुन्हा केल्याचे कबुली  दिल्याने त्यांना अटक करण्यात आली असून सदर आरोपींना मा.हु॥  कोर्टा समक्ष हजर केले असता आरोपींची दिनांक २६ /११/ २०२० रोजी पर्यंत पोलिस कस्टडी रिमांड मंजूर करण्यात आली आहे.

सदर आरोपींचा शोध घेणेकामी स.पो.नि.नागेश मगर, स.पो.नि.वैभव मारकड, पो.स.ई.दत्तात्रय पुजारी, परि.महिला पो.स.ई. सारिका शिंदे, पोलीस अंमलदार रामचंद्र चौधरी,संतोष घोगरे,मंगेश पवार,बाळासाहेब पानसरे, अमितकुमार यादव, सुभाष गोरे, हरिश्चंद्र पाटील, विश्वास शिनगारे, बबन साळुंखे, प्रवीण हिंगणगावकर, शिवाजी जाधव, समाधान देशमुख, शिवाजी पांढरे, नीलेश काशीद, विकी घाटगे, नितीन लोखंडे, मनोज शिंदे, उमेश खराडे, पांडुरंग जाधव यांनी उत्कृष्ट कामगिरी करून गुन्हा उघडकीस आणला आहे. सदरील गुन्ह्याचा पुढील तपास सहा. पोलीस निरीक्षक नागेश यमगर हे करित आहेत.

Reactions

Post a Comment

0 Comments