मृतदेह घेऊन निघालेल्या ऍम्ब्युलन्सची ट्रकला पाठीमागून धडक तीन जण जागी ठार तर दहा जखमी
मोहोळ (क.वृ.) :- पुण्याहून तेलंगणाच्या दिशेने मृतदेह घेऊन निघालेल्या ॲम्बुलन्सने धावत्या ट्रकला पाठीमागून धडक दिल्याने भीषण अपघात झाला. यामध्ये ॲम्बुलन्स मधील तिघांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला असून अन्य १० जण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात शनिवारी पहाटे ३.४५ वा. सोलापूर-पुणे महामार्गावर मोहोळ शहरात घडला. सर्व जखमींवर सध्या सोलापूरच्या सिव्हिल रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
या बाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, तेलंगणा येथील एक कुटुंब नातेवाईकाचा मृतदेह घेऊन अॅबुलन्सने (एम.एच. १२. आर.एन. ६३८७) तेलंगणाच्या दिशेने निघाले होते. शनिवारी पहाटे ३.४५ वाजता त्यांची अॅबुलन्स मोहोळ शहरातील कन्या प्रशाला चौक येथे आली असता, सोलापूरच्या दिशेने निघालेल्या धावत्या ट्रकला ( ट्रक क्र. एम.एच. ४३. बी.जी. ४५००) ॲम्बुलन्सची पाठीमागून जोरात धडक बसली. त्यामुळे भीषण अपघात होऊन ॲम्बुलन्स मधील १३ लोक गंभीर जखमी झाले.
अपघाताची माहिती मिळताच मोहोळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत सर्वप्रथम जखमींना शासकीय रुग्णवाहिकेतून उपचारासाठी तात्काळ सोलापूरच्या सिव्हिल रुग्णालयात पाठवून दिले. त्यांपैकी तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या अपघाताबाबत मोहोळ पोलिस स्टेशन स्टेशन नसल्याने यातील जखमी आणि मृतांची नावे समजू शकली नाहीत. या अपघातामध्ये ॲम्बुलन्स कॅबिनचा अक्षरशः चक्काचुर झाला आहे.
0 Comments