मोहोळचे आमदार यशवंत माने यांचे विरुद्धची तक्रार; जात वैधता पडताळणी समितीने फेटाळली
" अखेर सत्याचा विजय "
माझ्या जात वैधता प्रमाणपत्राबाबत केलेली तक्रार ही केवळ राजकीय द्वेषापोटी केली होती. तक्रारदाराची बुलढाणा जात वैधता प्रमाणपत्र पडताळणी समितीने तक्रारी अर्ज फेटाळून लावला आहे. अखेर सत्याचाच विजय होतो. - आ. यशवंत माने, मोहोळ.
पोखरापूर (क.वृ.) :- राष्ट्रवादी कॉंग्रेसचे मोहोळचे आ. यशवंत माने यांचे अनुसूचित जातीचे वैधता प्रमाणपत्र बेकायदेशीर असून ते रद्द करण्याचा मागणी शिवसेनेचे सोमेश नागनाथ क्षीरसागर यांनी बुलडाणा येथील जात वैधता प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे केली होती. मा.उच्च न्यायालयाच्या विविध न्यायनिवाड्याचे आधारे या समितीस पुनर्रनिर्णयाचे अधिकार प्राप्त नसल्याने त्यांचा अर्ज बुलढाणा जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने फेटाळून लावला आहे.
मोहोळ विधानसभा मतदारसंघ निवडणुकीत अटीतटीच्या लढतीत यशवंत माने विजयी झाले आहेत, त्यांच्या जात वैधता प्रमाणपत्राबाबत शिवसेनेचे सोमेश नागनाथ क्षीरसागर यांनी ३१ आंँगस्ट २०२० रोजी जात पडताळणी समिती बुलढाणा येथे तक्रार केली होती. त्यांच्या तक्रारी अर्जात म्हटले आहे की, आमदार यशवंत माने व त्यांचे बंधू यांनी ' कैकाडी' या जातीचे अनुसूचित जातीचे जात वैधता प्रमाणपत्र मिळविण्यासाठी गैरमार्गाचा अवलंब केला, प्रानताधिका-याची फसवणूक केली, चिखली येथील रहिवासी नसताना असल्याचे भासवून जातीचा दाखला मिळवला, तो बेकायदेशीरपणे मिळविला असल्याने रद्द करावा वगैरेंची तक्रार सोमेश नागनाथ क्षीरसागर यांनी समितीकडे केली होती.
जात वैधता प्रमाणपत्र पडताळणी समितीने दिलेल्या निरीक्षणात नमुद केले की, आ. यशवंत माने यांचा विद्यालयामार्फत २००९ मध्ये समितीकडे प्रस्ताव प्राप्त झाला होता. त्यानुसार समितीने उपलब्ध कागदपत्रांची तपासणी करून त्यांना जात वैधता प्रमाणपत्र पडताळणी करुन निर्गमित केल्याचे दिसून येते. तसेच त्यानंतर सन २०१७ मध्ये यशवंत माने यांच्या जात वैधता प्रमाणपत्राबाबत विलास देवराज भांगे यांनी तक्रारी अर्ज दिला होता. त्याअनुषंगाने या. उच्च न्यायालय मुंबई याचिका क्र. ८७०७/२०१७ मध्ये.दि.२१सप्टेंबर २०१७ रोजी आदेश पारित करून चौकशी करण्याचे आदेश दिले होते. त्याप्रमाणे समितीने ११सप्टेंबर २०१८ रोजी निर्णय दिलेला आहे. तशाच प्रकारच्या चौकशीसाठी सोमेश नागनाथ क्षीरसागर यांनी तक्रारी अर्ज दिला आहे. महराष्ट्र अनुसूचित जाती, जमाती, विमुक्त जाती समितीस पुनर्निर्णयाचे अधिकार प्राप्त नाहीत, समितीने दिलेला निर्णय अंतिम असेल, समितीच्या निर्णयाविरुद्ध मा. उच्च न्यायालयात दाद मागता येवू शकेल असे नमुद करीत मा. उच्च न्यायालयाच्या विविध न्यायनिवाड्याचे आधारे समितीस पुनर्निर्णयाचे अधिकार नसल्याने आमदार यशवंत माने यांच्या जात वैधता प्रमाणपत्राबाबत मोहोळचे सोमेश नागनाथ क्षीरसागर यांचा तक्रारी अर्ज बुलढाणा जात वैधता प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या त्रिस्तरीय समितीने ६ नोव्हेंबर २०२० रोजी फेटाळला आहे. त्यामुळे आमदार यशवंत माने यांच्या जात वैधता प्रमाणपत्राबाबतचा संभ्रम दूर झाला आहे.
वास्तविक पाहता या समितीने स्वतः केलेले पाप झाकण्यासाठी व राजकीय दबावापोटी आम्हाला साधी नोटीस ही न पाठविता घटनेच्या विरोधात निर्णय दिलेला आहे. आम्ही या विरोधात लवकरच मा. उच्च न्यायालयात दाद मागणार आहोत. - शिवसेना नेते सोमेश क्षीरसागर.
0 Comments