निवडणुकीसाठी आवश्यक पूर्वतयारी प्राधान्याने करा ; जिल्हाधिकारी तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या सूचना
जिल्हाधिकारी शंभरकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात आज निवडणूकविषयक तयारीबाबत बैठक झाली. जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, उपजिल्हा निवडणूक अधिकारी भारत वाघमारे यांनी जिल्ह्यातील उपविभागीय अधिकारी, तहसीलदार यांना व्हिडीओ कॉन्फरन्सव्दारे सूचना दिल्या. जिल्ह्यातील निवडणूकविषयक तयारीच्या कामकाजाचा आढावा घेऊन श्री. शंभरकर म्हणाले, जिल्ह्यात पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निवडणूक कामकाज सुरळीतपणे पार पाडण्यासाठी सर्व नोडल अधिकाऱ्यांनी सोपविण्यात आलेल्या जबाबदाऱ्या चोखपणे पार पाडाव्यात. मतदान केंद्राची तपासणी, आचारसंहिता कक्ष, तात्पुरते स्ट्रॉंग रुम, निवडणूकविषयक कामकाजासाठी आवश्यक कर्मचाऱ्यांची माहिती याबाबत तयारी करावी.
प्रत्येक मतदान केंद्रावर वैद्यकीय कर्मचारी नेमावयाचे आहेत. त्यांची यादी तयार करुन मंजुरी घ्यावी. अपात्र ठरलेल्या मतदारांची यादी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठवावी. संवेदनशील मतदान केंद्राबाबत पोलीस अधिकाऱ्यांशी संयुक्त बैठक घेवून त्याबाबतचा अहवाल पाठवावा, अशा सूचना श्री. शंभरकर यांनी दिल्या. उपजिल्हा निवडणूक अधिकारी वाघमारे यांनी नियुक्त करण्यात आलेले अधिकारी व त्यांच्यावर सोपविण्यात आलेल्या कामांची माहिती दिली. आदर्श आचारसंहिता राबवून निवडणुका सुरळीत पार पाडण्यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी झोकून देऊन काम करावे, असे ते म्हणाले.
जिल्हाधिकारी कार्यालयात उपजिल्हाधिकारी गजानन गुरव, दीपक शिंदे, अनिल कारंडे, मोहिनी चव्हाण, अरुणा गायकवाड, तहसीलदार जयवंत पाटील, अमोल कुंभार, रवींद्र चव्हाण, प्रशासन अधिकारी पंकज जावळे, लेखाधिकारी अजय पवार आदी अधिकारी उपस्थित होते.
0 Comments