टेंभुर्णी येथील मार्केट यार्ड मधील दुकाने फोडून अज्ञात चोरट्यांनी 3 लाख 23 हजार रुपयांचा ऐवज लंपास

टेंभुर्णी (क.वृ): टेंभुर्णी शहरात अज्ञात चोरट्यानी उच्छाद मांडला असून शहरात मार्केट यार्ड परिसरात सलग दोन दिवस शटर उचकटून धाडसी चोरी करीत तीन लाख २३ हजार रुपयांची रोख रक्कम चोरून नेली असून या चोरीच्या सत्राने नागरिकांत व दुकानदारात चोरट्यांची दहशत बसली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की,टेंभुर्णी शहरात २५ नोव्हेंबर व २६ नोव्हेंबर रोजी रात्रीच्या सुमारास मार्केट यार्ड परिसरातील दुकानांना टार्गेट करीत दुकानांची शटर उचकटली आहेत.यामध्ये एकूण तीन लाख २३ रुपयांची रोख रक्कम चोरी झाली आहे.
दि.२५ नोव्हेंबर रोजी रात्रीच्या सुमारास मार्केट यार्ड मधील विठ्ठल बझार मध्ये पाठीमागील खिडकीचे गज कापून अज्ञात चोरट्याने प्रवेश आत प्रवेश केला.तेथे बझारच्या कार्यालयातील कपाटात ठेवलेले विक्रीचे दोन लाख २६ हजार रुपये चोरून नेले.याबाबत बझारचे मॅनेजर गजानन तोडकर यांनी रीतसर फिर्याद नोंदविली.फिर्याद दाखल होताच पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन चोरीची माहिती घेतली.याठिकाणी उपअधीक्षक प्रभाकर शिंदे,राजकुमार केंद्रे,सपोनि सुशील भोसले यांच्यासह श्वान पथक व ठसे तज्ज्ञांनी भेट दिली असून चोरट्यांचे धागेदोरे मिळतात का?याची पाहणी केली.दरम्यान तेथील सीसीटीव्हीच्या फुटेजमध्ये एका चोरट्याचा चेहरा स्पष्ट दिसत आहे.
ही मोठी चोरी होऊन ही सलग दुसऱ्या दिवशी चोरट्यानी पुन्हा २६ नोव्हेंबर रोजी मध्यरात्री ते २७ नोव्हेंबर रोजी पहाटेच्या सुमारास या चोऱ्या झाल्या आहेत.यामध्ये विठ्ठल बझार चे शटर उचकटून दुसऱ्यांदा चोरी करण्याचा अयशस्वी प्रयत्न झाला.तर शिव इंटरप्रायजेश,दुर्गा मशिनरी,श्री दत्त मशिनरी,स्वामी समर्थ गॅस सर्व्हिस सेंटर,उत्कर्ष हार्डवेअर,धनलक्ष्मी अग्रो, दिपरत्न मशिनरी,दिपरत्न ऍग्रोटेक,स्वामी समर्थ वे ब्रिज,तरकारी दुकान,विठ्ठलराव कारखाना कार्यालय,अथर्व ऍग्रो,शिवतेज अग्रो,अनिकेत ऍग्रो आदी दुकानाची शटर उचकटली.
यामध्ये दुर्गा मशिनरी या दुकानाचे शटर उचकटून ५७ हजार रुपये रोख रक्कम चोरून नेली.स्वामी समर्थ वे ब्रिज मधील दोन हजार दोनशे रुपये रोख,ओम मोटर्स अँड आटोमोबाईल १५ हजार सातशे रुपये रोख रक्कम,तिरुमला व्हील अलायमेंट या दुकानातून दोन हजार तीनशे रुपये याप्रमाणे एकूण तीन लाख तेवीस हजार रुपये रोख रक्कम चोरीस गेली आहे.या चोरीचा सपोनि सुशील भोसले हे अधिक तपास करीत आहेत.
0 Comments