सांगोला येथील 'हे' आधार केंद्र करतेय ग्राहकांना बेजार - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, October 8, 2020

सांगोला येथील 'हे' आधार केंद्र करतेय ग्राहकांना बेजार

 सांगोला येथील 'हे' आधार केंद्र करतेय ग्राहकांना बेजार



कोरोनाचे प्रतिबंधात्मक नियम धाब्यावर बसवून सर्वसामान्यांची करीत आहे आर्थिक पिळवणूक

सांगोला दि.८(क.वृ.): आधार म्हणजे सामान्य माणसाचा अधिकार, हेच वचन सार्थ ठरवित सर्वच महत्वाच्या आणि कार्यालयीन कामासाठी नागरिकांचे 'आधार' कार्ड केंद्र सरकारने अधिकृत दस्तऐवज केला. याच आधारकार्ड ची दुरुस्ती,नविन काढण्यासाठी सांगोला शहरातील बँक ऑफ इंडिया जवळ सुरू असलेल्या आधार केंद्रात ग्राहकांची आर्थिक पिळवणूक केली जात असून एक आधारकार्ड काढण्यासाठी शंभर रुपये आणि दुरुस्तीसाठी ही शंभर रुपये मोजावे लागत आहे. शासनाने नाम मात्र शुल्क आकारून नागरिकांना आधारकार्ड काढून देण्याचे सक्तीचे केली असताना या केंद्रातील 'हे' केंद्रचालक महाशय मात्र लोकांची आर्थिक लूट करीत आहेत.

सांगोला शहरातील आणि ग्रामीण भागातील सामान्य नागरिकांना,लहान मुलांना, वयोवृद्धांना मात्र या केंद्रात मनस्ताप सहन करावा लागत आहे. लहान मुलांचे नवीन आधारकार्ड काढणे आणि ज्यांनी काढले आहे,अशांच्या लहान लहान चुका  चार ते पाच दिवस हेलपाटे मारून सुद्धा त्यांचे काम होत नाही,आणि हा महाशय मात्र नागरिकांनाच अर्वाच्च, आणि उद्धट भाषेत बोलत असल्याचे अनेक नागरिकांनी सांगितले आहे."फी" या गोंडस शब्दाखाली नागरिकांना मात्र आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे, पण आपले आधारकार्ड लवकर मिळेल या स भोळ्या भाबड्या आशेने सर्वसामान्य नागरिक मात्र कुठेही तक्रार करीत नाहीत,याचाच गैरफायदा हे आधारकेंद्र चालक घेताना दिसत आहे.सध्या कोरोनाने सर्वत्र भयभीत वातावरण निर्माण झाले आहे. सांगोला शहर आणि तालुक्यात कोरोनाग्रस्तांचा आकडा दोन हजारापार केला आहे. कोरोना प्रतिबंधात्मक उपायांची कडक अंमलबजावणी करण्याच्या शर्तीवर हे आधार केंद्र सुरू करण्याची परवानगी दिली आहे,मात्र या ठिकाणी सोशल डिस्टन्स बोजवारा उडालेला पाहायला मिळत आहे, स्वतः केंद्र चालकच विना मास्क,हॅन्डग्लोज,सॅनिटायझरचा वापर करीत नसल्याचे निदर्शनास आले असून या केंद्रात स्वच्छतेचा ही बोजवारा उडाल्याचे पहायला मिळत आहे.या सर्व कारणांचा विचार करताना कोरोनाचा अटकाव होण्याऐवजी हे केंद्र कोरोना वाढविण्यास मदत करते की काय ?अशी  भीती सर्व सामान्य नागरिक व्यक्त करीत आहेत.

त्यामुळे सर्वसामान्यांची सोय करण्यापेक्षा सर्वसामान्य नागरिकांना आधार कार्ड काढण्याच्या नावाखाली गैरसोय, मनस्ताप आणि आर्थिक लूट करणाऱ्या या केंद्र चालकांवर प्रशासनाकडून कारवाई व्हावी, हिच सर्वसामान्यांची अपेक्षा आहे. 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages