शेततळ्याचे रखडलेले अनुदान जमा करा रयत क्रांतीची मागणी,अन्यथा आंदोलनचा इशारा

लऊळ दि.२६(क.वृ.): रयत क्रांती संघटनेच्या वतीने सन 2018 पासून मागेल त्याला शेततळे या योजनेच्या अंतर्गत करण्यात आलेल्या शेतळ्याचे रखडलेले अनुदान मिळणेबाबत तालुका कृषी अधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे. 2018 पासून आजपर्यंत माढा तालुक्यातील चारशे ते पाचशे च्या दरम्यान शेततळयाची कामे झालेली आहेत परंतु 3 वर्ष पूर्ण होऊन देखील त्या शेततळ्याच्या कामाचे जवळजवळ 3 कोटी रुपये अनुदान आजपर्यंत रखडले आहे. त्यामुळे शेततळे तयार होऊन देखील शेतकऱ्यांचे अनुदान तीन वर्षे रखडल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे.
जिल्हा कृषी कार्यालय व तालुका कृषी कार्यालय यांच्याशी वारंवार संपर्क करून देखील गेली तीन वर्षे शेतकऱ्यांना फक्त उडवाउडवीची उत्तरे देत निधी नसल्याचे सांगितले जात आहे. त्या प्रकरणी आता रयत क्रांती संघटनेने निवेदन देऊन आंदोलनाचा इशारा दिला आहे. जर शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचे अनुदान लवकरात लवकर न मिळाल्यास रयत क्रांती संघटना जिल्हा कृषी कार्यालयासमोर 2 नोव्हेंबर रोजी आंदोलन करणार असल्याचे रयत क्रांती संघटनेचे पंडित साळुंखे यांनी सांगितले.
याप्रसंगी रयत क्रांती संघटनेचे पंडित साळुंके, संतोष कोळी, महाराष्ट्र विकास आघाडी विद्यार्थी तालुका अध्यक्ष जमीर सय्यद, मोहन नाईकवाडे किरण लवटे उपस्थित होते.
0 Comments