फिरत्या ओपीडी दवाखान्याचा सामान्यांना लाभ व्हावा- पालकमंत्री दत्तात्रय भरणे

सोलापूर, दि.४(क.वृ.): सोलापूर शहर व जिल्ह्यात कोरोनाबाधित रूग्णांवर सीसीसी, डीसीएचसी, डीसीएच आणि शासकीय दवाखान्याबरोबर इतर खाजगी दवाखान्यात उपचार होत आहेत. सोलापूर शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होऊ लागला आहे. मेट्रो एजन्सीच्या माध्यमातून सुरू होत असलेल्या फिरत्या ओपीडी दवाखान्याचा सामान्य रूग्णांना लाभ व्हावा, अशी अपेक्षा पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी व्यक्त केली.
होटगी रोड एमआयडीसी येथे सलीम शेख यांच्या मेट्रो एजन्सीतर्फे कोरोना रूग्णांसाठी फिरता ओपीडी दवाखाना सुरू करण्यात आला आहे. या दवाखान्यास श्री. भरणे यांनी भेट दिली. यावेळी माजी राज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे, महानगरपालिकेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र कोठे, माजी महापौर आरिफ शेख, यु.एन. बेरिया आदी उपस्थित होते.
श्री. भरणे म्हणाले, मेट्रो एजन्सीसारख्या अन्य सामाजिक संस्थांनी पुढाकार घेऊन शासनाला मदत केली तर कोरोनाला हरवू शकू. शेख यांचे कार्य कौतुकास्पद असून या पद्धतीचे दवाखाने सर्व ठिकाणी झाल्यास कोरोना रूग्ण कमी होण्यास मदत होणार आहे. खेडेगावातील रूग्ण दवाखान्यात जाऊ शकत नाही, त्यांच्यासाठी हा फिरता दवाखाना योग्य पर्याय आहे. आपल्या स्वत:च्या काळजीबरोबर कुटुंबातील सदस्यांचीही काळजी घ्यावी.
श्री. भरणे यांनी फिरत्या ओपीडी दवाखान्याची पाहणी करून माहिती घेतली. आणखी यामध्ये सुधारणा करण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या.
काय आहे संकल्पना
मेट्रो एजन्सीने हा दुसरा तयार केलेला फिरता दवाखाना आहे. पहिला दवाखाना दूध गल्ली (बीएसएनएल ऑफिसजवळ) बसविण्यात आला आहे तर दुसरा बाळीवेस येथे बसविण्यात येणार आहे. सध्या हा दवाखाना दोन बेड, एसी, शौचालयासहित उपलब्ध आहे. हा दवाखाना कोविड सेल म्हणून कार्य करणार आहे. कोरोना रूग्णांना या सेलमध्ये क्वारंटाईन करण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. यामध्ये 10 बेडचे नियोजन लवकरच करण्यात येणार आहे. यामध्ये डॉक्टर किंवा वैद्यकीय स्टाफसाठी केबीन असणार आहे. या दवाखान्याचे ऑफिसमध्येही रूपांतर करणे शक्य आहे.
0 Comments