Hot Posts

6/recent/ticker-posts

सोलापूर जिल्ह्याला कोरोनामुक्त करण्यासाठी एकजुटीने प्रयत्न करूया जिल्हाधिकारी शंभरकर यांचे आवाहन

 सोलापूर जिल्ह्याला कोरोनामुक्त करण्यासाठी एकजुटीने प्रयत्न करूया जिल्हाधिकारी शंभरकर यांचे आवाहन

सोलापूर, दि.१५(क.वृ.): कोरोनाविरुद्धच्या लढाईत प्रशासनासोबत लोकसहभाग महत्वाचा आहे. नागरिकांनी कोणताही आजार लपवू नये. वेळेत उपचार घेतले तर कोरोना बरा होतो. सोलापूर जिल्ह्याला कोरोनामुक्त करण्यासाठी एकजुटीने प्रयत्न करूया, असे आवाहन जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी केले.

‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या मोहिमेचा शुभारंभ आज सोलापूर जिल्ह्यातील सर्व गावात, नगरपालिका, महानगरपालिका क्षेत्रात झाला. जिल्हाधिकारी श्री. शंभरकर यांनी आज मुळेगाव (ता. दक्षिण सोलापूर) येथे भेट देऊन मोहिमेच्या सर्वेक्षणाची माहिती घेतली. यावेळी सरपंच ब्रह्मनाथ पाटील, तहसीलदार अमोल कुंभार, गटविकास अधिकारी राहुल देसाई, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. दिगंबर गायकवाड, परिसरातील लोकप्रतिनिधी, ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.

श्री. शंभरकर यांनी आज मोहिमेच्या शुभारंभानंतर दुपारी प्रत्यक्ष सर्वेक्षण कसे चालते याची माहिती घेऊन आरोग्य पथकाला विविध सूचना केल्या. त्यांनी पाच ते सहा घरांचे सर्वेक्षण कसे चालते? पथक त्यांना काय माहिती देते? आणखी काय माहिती द्यावी, याचे बारकाईने निरीक्षण केले. आरोग्य पथकाला साहित्याचे वाटप झाले आहे का?, कुटुंब प्रमुखांना त्यांनी सूचना केल्या की लहान मुलांना बाहेर जास्त पाठवू नका, त्यांची काळजी घ्या. मास्कचा वापर करा, हात साबणाने धुवा, गरज असेल तरच घराबाहेर जा.

सुरेखा वायकर यांच्या घरी श्री. शंभरकर यांनी भेट देऊन त्यांना जागरूक राहण्यास सांगितले. दक्षता काय घ्यावी, स्वत:ला किंवा कुटुंबातील व्यक्तिंना त्रास जाणवल्यास तत्काळ दवाखान्यात जा, हे स्वत:हून सांगण्यास सांगितले. सर्वेक्षण करताना ज्या घरात कुटुंबातील अन्य सदस्य नसतील, तिथे पुन्हा सर्वेक्षण करा, त्यांची तपासणी करा, ऑक्सिजन पातळी, तापमान घेण्याच्या सूचनाही त्यांनी पथकाला केल्या.

जिल्ह्यात आजपासून ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ ही मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेतून प्रत्येक नागरिकांची चौकशी, तपासणी करण्यात येणार आहे. तसेच कोरोना विरुद्ध लढतांना घ्यायची काळजी याबाबत जनजागृती करण्यात येणार आहे. ही मोहीम महत्वाची असून लोकप्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था सर्वांनी यामध्ये सामील होण्याचे आवाहन श्री. शंभरकर यांनी केले.

यावेळी ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच श्री. पाटील यांनी रस्ते, पाणी या समस्येबाबत माहिती देऊन जिल्हाधिकारी श्री. शंभरकर यांना निवेदन दिले.

तत्पूर्वी कंदलगाव येथे निवासी उपजिल्हाधिकारी अजित देशमुख यांच्या हस्ते ‘माझे कुटुंब-माझी जबाबदारी’  मोहिमेस प्रारंभ केला. यावेळी जिल्हा परिषद सदस्या विद्युलता कोरे, दक्षिण सोलापूर पंचायत समिती सभापती सोनाली कडते, अपर तहसीलदार  उज्ज्वला सोरटे, सरपंच रावसाहेब पाटील, पोलीस उपनिरीक्षक श्री. थिटे आणि वैद्यकीय अधिकारी डॉ. घोगरे उपस्थित होते.

Reactions

Post a Comment

0 Comments