अकलूज मधील व्यापारी व गाळेधारकांची होणार कोरोना टेस्ट

नागरीकांच्या सुरक्षेसाठी अकलूज ग्रामपंचायतीचा निर्णय- शिवतेजसिंह
अकलूज दि.४(क.वृ.): ‘चेस द व्हायरस’ या संकल्पनेचा आधार घेत अकलूज परिसरातील नागरीकांच्या सुरक्षेसाठी व कोरोनाचा संसर्ग थांबवण्यासाठी अकलूज परिसरातील व्यापारी, सर्व गाळेधारक, फळे व भाजी विक्रेते यांची दि.5 सप्टेंबर ते 8 सप्टेंबर दरम्यान कोरोना टेस्ट घेण्यात येणार असल्याची माहिती सरपंच शिवतेजसिंह मोहिते-पाटील यांनी दिली.
अकलूज व पर्यायाने माळशिरस तालुक्यात वाढत चाललेल्या कोरोना रूग्णांच्या पार्श्वभूमीवर माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील व आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली काल आढावा बैठक घेण्यात आली या बैठकीत ‘चेस द व्हायरस’ संकल्पनेतून कोरोना रूग्ण शोधून त्याच्या पासून होणारा संसर्ग थांबवण्यासाठी जास्तीत जास्त चाचण्या घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यामध्ये प्रामुख्याने जास्तीत जास्त लोकांच्या संपर्कात राहणारे व्यापारी, गाळेधारक, फळे व भाजी विक्रेते यांची चाचणी घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या बैठकीस तहसिलदार अभिजीत पाटील, गटविकास अधिकारी स्मिता पाटील, शिवामृत दूध संघाचे चेअरमन धैर्यशिल मोहिते-पाटील, सरपंच शिवतेजसिंह मोहिते-पाटील, तालुका आरोग्य अधिकारी रामचंद्र मोहिते, उपविभागीय पोलिस अधिकारी निरज राजगुरू, पोलिस निरीक्षक भगवानराव निंबाळकर, इंडियन मेडिकल असोसिएशनचे तालुकाध्यक्ष डॉ.नितीन एकतपुरे, उपजिल्हा रूग्णालयाच्या डॉ.सुप्रिया खडतरे, डॉ.संतोेष खडतरे उपस्थित होते.
बैठकीतील निर्णयानुसार आज सरपंच शिवतेजसिंह मोहिते-पाटील यांनी कोरोना टेस्ट घेण्यासदंर्भात आरोग्य अधिकार्यांशी चर्चा करून नियोजन केले त्यानुसार दि. 5 सप्टेंबर रोजी विजयसिंह मोहिते-पाटील क्रिडा संकुल समोरील व नवीन एस.स्टी स्टँड मागील व्यापारी, गाळेधारक, फळे व भाजी विक्रेते यांची क्रिडासंकुल येथे, प्रतापसिंह चौक येथील जि.प.शाळा गणेशनगर येथे, महात्मा फुले भाजी मंडई येथील जुने एस.टी स्टँड येथे टेस्ट घेण्यात येणार आहेत. दि. 6 सप्टेंबर रोजी शिवापूर येथील व्यावसायिकांच्या बहुुउद्देशिय सभागृह व कौलारू शाळा येथे, दि.7 सप्टेंबर रोजी गांधी चौक, जुने एस.टी स्टँड येथील बहुउद्देशिय सभागृह, जुने एस.टी स्टँड येथे, दि.8 सप्टेंबर रोजी जुने एस.टी.स्टॅण्ड पासून ते सदुभाऊ चौक, ते प्रतापसिंह चौक या मार्गावरील गाळेधारक, व्यापारी यांची सदाशिवराव माने विद्यालय व जि.प.शाळा गणेशनगर येथे टेस्ट घेण्यात येणार आहे. त्याच बरोबर या व्यावसायिकांच्या कुटुंबांतील 55 वर्षावरील आजारी रूग्णांच्या, प्रतिबंधित क्षेत्रातील ज्येष्ठ नागरीक व आजारी रूग्ण तसेच दाट लोकवस्ती असलेल्या ठिकाणच्या नागरीकांच्याही कोरोना टेस्ट घेण्यात येणार आहेत. या टेस्ट माळशिरस तालुका तालुका आरोग्य विभाग व प्रायव्हेट लॅब टेक्निशियन यांच्या सहाय्याने घेण्यात येणार असल्याचे सरपंच शिवतेजसिंह मोहिते-पाटील यांनी सांगितले.
0 Comments