वाढीव वीज बिले कमी न केल्यास आंदोलन करणार आ. सुभाष देशमुख यांचा ईशारा
सोलापूर दि.१२(क.वृ.): लॉकडाऊनच्या काळात जिल्ह्यातील कारखाने आणि घरगुती ग्राहकांना महावितरणने भरमसाठ बिले दिली आहेत. कोरोनाच्या महामारीतून अद्याप कारखाने आणि सर्वसामान्य माणूस बाहेर आला नाही. तरी ही वाढीव बिले कमी करून आकारण्यात यावीत अन्यथा भाजपच्यावतीने संपूर्ण जिल्ह्यात तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा ईशारा भाजपच्यावतीने आ. सुभाष देशमुख यांनी महावितरण आणि जिल्हाधिकार्यांना निवेदनाद्वारे दिला आहे.
कारखानदार आणि घरगुती ग्राहकांना वाढव बिले दिल्याबद्दल बुधवारी आ. देशमुख यांनी महावितरणच्या कार्यालयात अधीक्षक अभियंता पडळकर यांची भेट घेत त्यांना निवेदन दिले. यावेळी बोलताना आ. देशमुख म्हणाले की, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण जिल्ह्यात लॉकडाऊन करण्यात आले होते. या कालावधीत कारखाने, उद्योग, व्यवसाय पूर्णपणे बंद होते. अद्यापही काही उद्योग पूर्ण क्षमतेने सुरू झाले नाहीत. लॉकडाऊन असल्यामुळे सर्वसामान्या माणूसही घरातच बसून होता. अशा परिस्थितीत महावितरणने प्रतिमहा आकारण्यात येणार्या बिलांच्या तुलनेत अधिक वीज बिले कारखाना आणि ग्राहकांना दिली आहेत. याशिवाय विजेचे दरही 1 एप्रिलपासून वाढवले आहेत. लॉकडाऊनमुळे अधिच सर्वसामान्य माणूस आर्थिक अडचणीत सापडला आहे. तरीही त्यांना बिले भरण्याचा आग्रह केला जात आहे. तरी महावितरणने वाढीव बिले कमी करून आकारावीत, अशी आमची मागणी आहे. महावितरणने बिले कमी केली नाहीत तर भाजपच्यावतीने संपूर्ण जिल्ह्यात तीव्र आंदोलन करण्यात येईल. यावेळी शहराध्यक्ष विक्रम देशमुख, भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष शहाजी पवार, दक्षिणचे तालुकाध्यक्ष रामप्पा चिवडशेट्टी, उत्तर तालुकाध्यक्ष काशिनाथ कदम आदी उपस्थित होते.
0 Comments