खासगी दवाखान्यांच्या बिलांचे लेखा परीक्षण काळजीपूर्वक कराजिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या सूचना
सोलापूर, दि.३०(क.वृ.): खाजगी दवाखान्यांच्या बिलांबाबत सामान्य जनतेच्या तक्रारी येता कामा नयेत. खाजगी दवाखान्यातील बिले शासकीय नियमानुसार आहेत की नाहीत, याचे लेखा परीक्षण काळजीपूर्वक करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी संबंधितांना दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयात खाजगी दवाखान्यातील बिलाबाबत व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आयोजित आढावा बैठकीत श्री. शंभरकर बोलत होते. बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी अजित देशमुख, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदीप ढेले, महापालिकेचे कोविड समन्वयक धनराज पांडे यांच्यासह व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश वायचळ, सर्व प्रांताधिकारी, तहसीलदार, तालुका आरोग्य अधिकारी, लेखा परीक्षक सामील झाले होते.
श्री. शंभरकर यांनी सांगितले की, ‘लेखा परीक्षकांनी खाजगी दवाखान्यातील बिलांबाबत रूग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांच्या तक्रारी येणार नाहीत, याबाबत काळजी घ्यावी. ऑक्सिजन, पीपीई कीट याबाबतीत चार्जेस शासकीय नियमानुसार आहेत का, याची पाहणी करूनच बील देण्यास सांगावे’.
दवाखान्यांनी कोविड आणि नॉन कोविड बेडची माहिती डॅशबोर्डद्वारे जनतेला समजेल अशा ठिकाणी लावायला हवी. यामध्ये महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेच्या बेडची माहितीही द्यायला हवी. 21 मे 2020 च्या शासन निर्णयानुसार बील आकारणी होते की नाही, हे काम लेखा परीक्षकांनी संबंधित यंत्रणेशी लक्षात आणून द्यायला हवे. रूग्णांकडून जास्त बील आकारणाऱ्या रूग्णालयांवर कडक कारवाई केली जाईल. महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजना शासनाने सर्वांना लागू केली आहे. कोरोनाचा रूग्ण गंभीर असेल तर त्याला सुविधा मिळतात. कोविड हॉस्पिटलसाठी घेतलेल्या रूग्णालयातील 80 टक्के बेड कोरोना रूग्णांसाठी असणार आहेत, यातील 25 टक्के बेड हे जनआरोग्य योजनेसाठी आहेत, असेही त्यांनी सांगितले.
दवाखान्याने दिलेले बील, शासकीय दरानुसार बिलातील तफावत याबाबत हॉस्पिटलचे प्रशासन ऐकत नसतील तर जिल्हा समितीकडे पाठवावीत, असेही त्यांनी स्पष्ट केले.
डॉ. ढेले म्हणाले, जनतेच्या सोयीसाठी सर्व ठिकाणच्या दवाखान्यात आरोग्य मित्रांची नेमणूक केली आहे. दवाखान्यातील खाटांची माहिती नागरिकांनी आरोग्यमित्रांकडून घ्यावी.
यावेळी प्रांत, तहसीलदार, लेखा परीक्षक यांच्या अडचणी जाणून घेऊन श्री. देशमुख, श्री. पांडे यांनीही मार्गदर्शन केले.
0 Comments